Monkeypox धडकी भरवणारा! जगातील 80 देशांत वेगाने प्रसार; भारत, स्पेन, ब्राझीलमध्ये ठरला जीवघेणा By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:51 PM 2022-08-01T15:51:02+5:30 2022-08-01T16:07:06+5:30
Monkeypox : भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात अत्यंत वेगाने मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. जगातील तब्बल 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 21000 रुग्ण आढळून आले आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये वेगाने रुग्ण आढळून येत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत चिंता व्यक्त केली असून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे पाच रुग्ण समोर आले आहेत. तर केरळमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. भारतात हा या आजारमुळे झाला पहिला मृत्यू आहे. तसेच केंद्र सरकारने देखील या प्रकरणाची गांभीर्याने देखल घेतली आहे. तसेच केंद्र सरकारने याचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स तयार केलं आहे.
फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात अत्यंत वेगाने मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. जगातील तब्बल 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 21000 रुग्ण आढळून आले आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने याला ग्लोबल हेल्थ पब्लिक इमर्जन्सी म्हणून घोषित केलं आहे.
मंकीपॉक्समुळे आफ्रिकेत 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यातील सर्वाधिक मृत्यू हे कांगो आणि नायझेरियामध्ये झाले. याशिवाय स्पेन, ब्राझील आणि भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.
ब्राझीलमध्ये मंकीपॉक्सचे 1066 रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये 3750 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 120 जण हे रुग्णालय़ात भरती आहेत. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांना त्याचा जास्त धोका असल्याने त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती ही इतरांच्या तुलनेत कमकुवत असते. लहान मुलांना याचा सर्वात जास्त धोका असतो. याआधी 1970 मध्ये 9 वर्षांच्या लहान मुलामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.
गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली.
महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत खात्री करून घ्यावी. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा.
मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे, शरीरावर चिकनपॉक्सप्रमाणे फोड दिसून येणं. मंकीपॉक्स झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे.
भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले. केरळमध्ये तीन रुग्ण सापडले असून 14 जुलैला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. तीन रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री असून ते संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.