Monkeypox : चिंता वाढली! मंकीपॉक्सची आता भारतात धडक; कोरोनासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 03:11 PM 2022-07-16T15:11:51+5:30 2022-07-16T15:36:55+5:30
Monkeypox In India : देशात मंकीपॉक्सने धडक दिली आहे. मंकीपॉक्स किती संसर्गजन्य? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 566,619,253 वर पोहोचली आहे. तर 6,386,211 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 5,25,660 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना देशात मंकीपॉक्सने धडक दिली आहे. मंकीपॉक्स किती संसर्गजन्य? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोलम जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला लागण झाली असून सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम केरळमध्ये पाठवली आहे. कोरोनासारखीच मंकीपॉक्समुळे परिस्थिती निर्माण होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांनी आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
इंडिया मेडिकल टास्क फोर्सशी संबंधित डॉक्टर राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना सारखा मंकीपॉक्स हा वेगाने पसरणारा आजार नाही. युरोप, अमेरिकेत अनेक रुग्ण आढळून आले. मात्र अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
मंकीपॉक्स हा प्रामुख्याने रुग्णांच्या संपर्कात आल्याने किंवा शारीरीक संबंधातून होता. त्यामुळे मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीपासून सावध राहा असा मोलाचा सल्ला देखील डॉक्टर जयदेवन यांनी दिला आहे.
डॉक्टर सुप्रदीप घोष यांनी मास्क लावल्यास कोरोनापासून बचाव होण्यास थोडी मदत होते पण मंकीपॉक्सच्या बाबतीत असं काही नसल्याचं म्हटलं आहे. तसेच तो ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरत नसल्याचं म्हटलं आहे.
मंकीपॉक्सच्या बाबतीत असलेल्या काही चुकीच्या सुचनांपासून आपण सावध राहिलं पाहीजे. मंकीपॉक्सचा संबंध हा माकडांसोबत लावणं देखील चुकीचं आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांबाबत देखील काळजी करू नका असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
सुप्रदीप घोष यांनी मंकीपॉक्सला पाहता सरकारी रुग्णालयात विशेष तयारी करण्याची तसेच आयसीयू स्पेशालिस्ट तैनात करण्याची गरज आहे. जेणेकरून ते मंकीपॉक्सच्या रुग्णांवर योग्य उपचार करतील.
कोरोनाच्या संकटात आपण सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे अनेक उपाय शिकलो. आता तेच कायम ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून आपण इतर आजारांना देखील रोखू शकू असं राजीव जयदेवन यांनी सांगितलं.
मंकीपॉक्स व्हायरसचा इन्क्यूबेशन पीरियड हा सहा ते 13 दिवसांचा असतो. तर अनेकदा तो 21 दिवसांपर्यंत देखील असू शकतो. लक्षणं दिसण्यासाठी किती वेळ लागून शकतो त्याला इन्क्यूबेशन पीरियड असं म्हणतात.
मंकीपॉक्स संक्रमित लोकांमध्ये पाच दिवस खूप ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, थकवा यासारखी लक्षणं दिसून येतात. मंकीपॉक्सहा सुरुवातीला चिकनपॉक्ससारखा दिसतो. नंतर त्याचा त्वचेवर परिणाम दिसू लागतो.
शरीरावर फोड येतात. हाता-पायावर बारिक बारिक फोड दिसू लागतात. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्या संबंधित काही तक्रारी जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.