अलर्ट! मंकीपॉक्सची लस 100% प्रभावी नाही?; WHO ने केला मोठा खुलासा, दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:42 PM2022-08-18T15:42:25+5:302022-08-18T15:51:37+5:30

Monkeypox : जगभरातील 92 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 35,000 हून अधिक रुग्ण आढळून आली असताना त्यांनी हे विधान केले आहे. या आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका आजाराने थैमान घातले आहे. मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स वेगाने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. WHO चे रोसमंड लुईस (Rosamund Lewis ) यांनी मंकीपॉक्स लसीबाबत मोठा खुलासा केला आहे.

मंकीपॉक्स लस 100 टक्के प्रभावी नाही. अशा परिस्थितीत आता लोकांनी संसर्गाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरातील 92 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 35,000 हून अधिक रुग्ण आढळून आली असताना त्यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, या आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. लुईस म्हणाले की, मंकीपॉक्स रोखण्यासाठी या लसी "100 टक्के प्रभावी" असतील असा दावा WHO करत नाही.

लुईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सवर लस हा पूर्ण उपाय नाही. तसेच याचा धोका कमी करण्यासाठी लसींवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व लोकांनी या व्हायरसपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. मंकीपॉक्समुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सची 7,500 रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी मागील आठवड्यापेक्षा 20 टक्के जास्त आहे. युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली जात आहे.

बहुतेक लोक सहसा उपचार न करता काही आठवड्यांतच मंकीपॉक्सपासून बरे होतात. त्याची लक्षणे सुरुवातीला फ्लूसारखी असतात, जसे की ताप, थंडी वाजणे. डब्ल्यूएचओच्या मते, हा व्हायरस लहान मुले, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये अधिक गंभीर असू शकतो.

मंकीपॉक्स व्हायरस त्वचा, श्वसनमार्ग, डोळे, नाक, तोंड आणि शरीरातील द्रवपदार्थांद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. मंकीपॉक्स हा एक जूनोटिक डिजीज आहे. जो विशेषत: प्राण्यांमध्ये आढळतो, तसेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागात आढळतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात मंकीपॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यादरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची सूचना जारी केली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोणीही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात दीर्घकाळ किंवा वारंवार राहिल्यास या व्हायरसचा धोका होऊ शकतो.

आरोग्य मंत्रालयाने संक्रमित व्यक्तीला इतर लोकांपासून वेगळे ठेवण्याच्या सल्ल्यावर भर दिला आहे, जेणेकरून व्हायरस पसरू नये. तसेच, हँड सॅनिटायझरचा वापर, किंवा साबण आणि पाण्याने हात धुणे, मास्कने तोंड झाकणे आणि रुग्णाजवळ डिस्पोजेबल हातमोजे वापरणे, हात आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करणे, असे सांगण्यात आले आहे.

ज्या रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यासोबत चादर, कपडे आणि टॉवेल शेअर करणे टाळा. त्याचबरोबर, संक्रमित व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांना जाणे टाळावे. तसेच, व्हायरसबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे या व्हायरसवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि केंद्र सरकारने संसर्गाचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. सरकारी सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे टास्क फोर्स देशातील रोगावरील उपचारांसाठी सुविधांचा विस्तार आणि या व्हायरसचे लसीकरण यासंबंधीच्या बाबींवरही सरकारला सूचना देईल.

टॅग्स :भारतIndia