Morbi Bridge Collapse: १४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की... By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 08:46 AM 2022-10-31T08:46:15+5:30 2022-10-31T08:53:11+5:30
Gujarat bridge collapse updates and history: गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. या पुलाचे कंत्राट असणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना हा मोरबीचा झुलता पूल आताचा नाही तर तब्बल १४० वर्षे जुना असल्याचे समोर येत आहे.
मोरबीमधील झुलता पूल हा खूप जुना म्हणजे इंग्रजांच्या काळातील आहे. या पुलाचे निर्माण १८८७ मध्ये मोरबीचे तत्कालीन राजे वाघजी रावाजी ठाकोर यांनी केले होते. मच्छु नदीवरील हा पूल मोरबीच्या लोकांसाठी एक उत्तम टुरिस्ट स्पॉट बनला होता. या ऐतिहासिक पुलाचे वैशिष्ट हे होते की, जेव्हा हा पूल बनविला गेला तेव्हा युरोपमधील तत्कालीन सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले होते. यानंतर इंग्रजांच्या काळातही हा पूल एक आदर्श इंजिनिअरिंगचा प्रतिक होता.
गेल्या काही वर्षांपासून वेळोवेळी या पुलाची दुरुस्ती केली जात होती. दिवाळीनिमित्त हा पुल खुला करण्यात आला होता. गेल्या सात महिन्यांपासून हा पूल दुरुस्तीसाठी बंद होता. यामुळे या पुलावर गर्दी उसळली होती. क्षमतेपेक्षा वजन जास्त झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
हा पुल 1.25 मीटर रुंद होता. तो गढ पॅलेस आणि लखधीरजी इंजीनियरिंग कॉलेजला जोडत होता. याच्या दुरुस्तीसाठी नुकतेच दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. राजकोट जिल्ह्यापासून हा पूल ६४ किमी दुरवर होता. इंजिनिअरिंग आणि ऐतिहासिक असल्याने गुजरात राज्याने या पुलाला पर्यटनाच्या यादीत घेतले होते. जेव्हा हा पुल सुरु करण्यात आला तेव्हा तज्ज्ञांकडून त्याची डागडुजी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
पुलाची लांबी 765 फुट आणि रुंदी साडे चार फुटांची होती. पुलाच्या नुतनीकरणासाठी सरकारने टेंडर काढले होते. ते ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपला देण्यात आले होते. याच कंपनीला पुढील १५ वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते. मात्र, सुरु करताच पाचव्या दिवशी हा अपघात घडला.
मोरबीचे पालिका मुख्याधिकारी संदीप सिंह झाला यांनी आपल्याकडे पूल उघडण्याची परवानगी मागितली गेली नव्हती. आम्ही कोणतेही फिटनेस सर्टिफिकेट दिले नव्हते. कंपनीने कोणतीही क्वालिटी चेक केले नव्हते, असा दावा केला आहे.
या पुल दुर्घटनेत भाजपाचे खासदार मोहन भाई कुंदरिया यांच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. मोहनभाई यांच्या बहीणीच्या दीराच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. या पुल दुर्घटनेत ज्याची चूक असेल त्याला सोडले जाणार नाही. या दुर्घटनेचे १०० टक्के सत्य समोर येणार आहे. मोदी देखील रात्रभर फोनवरून अपडेट घेत आहेत, असे खासदार म्हणाले.