5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:19 PM2022-10-30T22:19:34+5:302022-10-30T22:24:31+5:30

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झुलता पूल कोसळल्याने 60हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

घटनेवेळी पुलावर शेकडो लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत जाहीर केली आहे. तसेच, राज्य सरकारने या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना केली आहे. हा पूल पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता.

गेल्या सात महिन्यांपासून या शेकडो वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. रविवारची सुट्टी असल्यामुळए शेकडो लोक पुलावर फिरायला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी पुलावर अंदाजे 500 लोक उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाचे अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाची लांबी 200 मीटरपेक्षा जास्त होती, तर रुंदी सुमारे 3 ते 4 फूट होती. या दुर्घटनेनंतर तुटलेल्या पुलाचे अनेक फोटो समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत कोसळल्याचे दिसत आहे. पूल कोसळल्यानंतर अनेकजण तुटलेल्या पुलावर अडकले, तर इतर नदीत पडले. या दुर्घटनेनंतर सरकारकडून बचाव आणि शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, राज्य सरकारचे आरोग्य आणि गृहमंत्रीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. पटेलदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. राज्य सरकार आणि केंद्राने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची जाहीर केली आहे. तसेच, पीएम नरेंद्र मोदी यांनी मृतांसाठी 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये जाहीर केले आहेत.

विशेष म्हणजे, दुरुस्तीनंतर 5 दिवसांपूर्वीच हा पूल सामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. नूतनीकरणानंतरही एवढ्या मोठा अपघात झाल्यामुळए अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पूल खुला करण्यापूर्वी फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे. काम पूर्ण न करता पूल खुला केला, असा आरोपही होत आहे.