प्रभू श्रीराम नेपाळी म्हणणाऱ्या PM ओलींना सीता मातेनं दिलं मजेशीर उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 08:59 PM 2020-07-21T20:59:11+5:30 2020-07-21T21:14:24+5:30
भारतीय भूमीवर दावा करून नेपाळच्या नकाशात बदल करण्याची आगळीक केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील सांस्कृतिक वारशावरही आघात करण्यास सुरुवात केली.
भारतीय जनमानसात पुजनीय असलेले भगवान श्रीराम हे नेपाळी होते, तसेच भारतातील अयोध्या ही नकली असून, खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावा ओली यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
श्रीराम आणि अयोध्येवरून बरळणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांवर शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे.
शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर बोचरी टीका केली. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे दखलपात्र राजकारणी नाहीत. भारतविरोधी वक्तव्यांमुळे ते सध्या चर्चेत आहेत.
ओली हे हिंदू असले तरी ते चीनचे हस्तक आहेत. चीनची रखेल असल्याप्रमाणे त्यांचे वर्तन आहे. ते नेपाळच्या पंतप्रधानपदी राहावेत, यासाठी चीन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहे.
खुद्द ओलींच्या परदेशी खात्यात ४५ कोटी जमा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत, अशा ओलींनी भारतविरोधी भूमिका घेणे स्वाभाविक आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
ओली यांच्या श्रीरामांसदर्भातील विधानावर आता रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलीया यांनी मजेशीर ट्विट केलं आहे.
दीपिका यांनी एक फोटो शेअर करत, आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. प्रभू, आपने कभी बताया नही कि आप नेपाली हो.. असे कॅप्शन दिलेला हनुमान, श्रीराम आणि लक्ष्मण यांचा रामायण मालिकेतील फोटो शेअर केला आहे.
हनुमानजी यांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, असंही दीपिका यांनी म्हटलंय. दीपिका यांच्या ट्विटवर अनेकांनी स्माईलीचे इमोजी शेअर करत दाद दिली आहे.
दरम्यान, देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रामायण आणि महाभारताचे पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारण करण्यात आले होते, त्यासही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
दीपिका चिखलिया यांची सीता मातेची भूमिका अजरामर झाली असून लोकं आजही त्यांना सीता या नावानेच ओळखतात