बांगलादेश नव्या मित्रांच्या शोधात! भारतासाठी 'रिंग ऑफ फायर' बनवतायेत मोहम्मद युनूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:17 IST2025-03-08T12:12:58+5:302025-03-08T12:17:58+5:30

भारताच्या कुख्यात शेजारील राष्ट्रांच्या यादीत वाढ झालीय. या यादीत आता बांगलादेशचा समावेश झाला आहे. पाकिस्तानसोबत मैत्री वाढवल्यानंतर आता बांग्लादेश चीनसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे येत्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेश डोकेदुखी ठरत आहे.

चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये एक रिपोर्ट छापला आहे. त्यानुसार, २५ फेब्रुवारी ते ६ मार्च या काळात बांगलादेशाचं २१ सदस्यीय शिष्टमंडळ बीजिंग दौऱ्यावर होते. त्यात पत्रकार, राजकीय नेते आणि विद्यार्थी नेतेही सहभागी होते. यावेळी चीनच्या तंत्रज्ञान आणि विकासाबाबत चर्चा करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल्ट अँन्ड रोड इनिशिएटिव्ह बाबत बांगलादेशच्या शिष्टमंडळाचं ब्रेनवॉश करण्यात आलं.

चीन बांगलादेशाला कर्ज फेडण्यासाठी आणखी काही मुदत वाढवून देण्यास तयार आहे. बीजिंग बांगलादेशावर लावलेले व्याजदर कमीही करण्याची शक्यता आहे. चीनला बांगलादेशाला त्यांच्यासोबत ठेवायचं आहे. बांगलादेशाने चीनकडे व्याजदर २-३ टक्क्यावरून घटवून १ टक्के करण्याचं आवाहन केले आहे.

अमेरिकन थिंक टँक इन्स्टिट्यूटनुसार, २०२३ पर्यंत बांगलादेशात चीनने एकूण ७.०७ बिलियन डॉलर गुंतवणूक केली आहे. परंतु त्यावेळी देशात शेख हसीना यांचं सरकार होते, हसीना सरकार भारताच्या दिशेने झुकलेले होते परंतु आता सत्तापालट झाल्यानंतर चीनला बांगलादेशात त्यांची रणनीती बनवणं खूप सोपे झाले आहे.

चीन बांगलादेशातील या जवळकीमुळे भारताच्या अडचणीत भर पडणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये शेख हसीना यांना सत्तेबाहेर काढण्यासाठी चीनने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती असं छापून आलं होते.

ISI चं समर्थन करणाऱ्या जमात ए इस्लामी आणि त्यांच्या विद्यार्थी संघटना, इस्लामी विद्यार्थी शिबीरने कथितपणे आरक्षण विरोधी आंदोलन चीन आणि पाकिस्तानच्या मदतीने हिंसक बनवले. चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून बांगलादेशात पैसे पाठवले. चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाकडून ही मदत देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

त्यातच बांगलादेशाने आणखी एक पाऊल उचललं आहे जे भारताला चिंतेत टाकणारं आहे. बांगलादेशाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी मालवाहक जहाजाला बांगलादेशच्या मोंगला बंदरावर येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानातून ५० हजार मेट्रीक टन बासमती तांदूळ आयात करण्याबाबत बांगलादेश-पाकिस्तान सरकारमध्ये करार झाला होता.

भारताला टेन्शन देण्यासाठी पाकिस्तानी ISI बांगलादेशात पुन्हा पाय रोवत आहे. त्यात बांगलादेशातील जेलमध्ये बंद असलेल्या कुख्यात दहशतवाद्यांना सोडण्याची चर्चा सुरू आहे. गुप्त माहितीनुसार, जमात ए इस्लामी, इस्लामी विद्यार्थी शिबीरसारख्या आयएसआय समर्थित संघटना कट्टरपंथीचं नेटवर्क मजबूत करत आहेत. जे बांगलादेशाची सुरक्षा आणि भारताच्या सीमेवरही धोका निर्माण करू शकते.

या सगळ्या घडामोडीत बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी इशारा दिला आहे की, जर अंतरिम सरकार कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करण्यात अपयशी ठरले आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला तर सैन्य हस्तक्षेप करू शकते.

पुढील काळात पाकिस्तानी सैन्य बांगलादेशातील जवानांना ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान यांच्यात सीक्रेट माहिती एकमेकांना देणेही सुरू झाले आहे. चीनही बांगलादेशाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश आणि पाकिस्तान या तिघांची जोडगोळी भारतासाठी त्रासदायक ठरणार आहे.