शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास? By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:03 PM 2024-11-22T14:03:41+5:30 2024-11-22T14:14:04+5:30
Indian Army multi-utility legged equipment: सीमा रेषेवर पहारा देण्यासाठी आता रोबोटिक श्वान तयार करण्यात आला आहे. मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट म्हणजे रोबोटिक श्वान देखील तैनात करण्यात येणार आहे. देशाच्या सीमांवर जवानांसोबत आता ‘मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट’ अर्थात रोबोटिक श्वान देखील तैनात करण्यात येणार आहेत. ते कोणताही उंच पर्वतापासून पाण्यात खोलवर जाऊन काम करण्यास सक्षम आहेत.
रोबोटिक श्वानांचा काही आठवड्यांपूर्वी लष्करी उपकरणांच्या प्रदर्शनात डेमो दाखविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची लष्करासोबत चाचणी करण्यात आली.
जैसलमेर येथील पोकरण फायरिंग रेंजमध्ये रोबोटिक श्वांनांनी सैन्याच्या बॅटल एक्स विभागासोबत १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत युद्धाभ्यासही केला. त्यात १० श्वानांना सहभागी करून घेण्यात आले होते.
शत्रुला शोधणे, शस्त्र नेणे, कॅमेऱ्याद्वारे शत्रुच्या ठिकाणांची माहिती देणे इत्यादी चाचण्या यावेळी करण्यात आल्या. भारतीय सैन्याने सीमेलगतच्या विशेषत: उंच ठिकाणांवर गस्तीसाठी १०० रोबोटिक श्वानांचा समावेश केला आहे.
चीनने यापूर्वीच अशा श्वानांचा समावेश केलेला आहे. बर्फाळ प्रदेश, वाळवंट, उंच पायऱ्या तसेच पर्वतीय भागातील सर्व अडथळ्यांना पार करण्यास हे श्वान सक्षम आहेत.
रोबोटिक श्वान कसे काम करतात? - हा एक प्रकारचा रोबोट आहे. त्यात अत्याधुनिक आणि अतिशय शक्तिशाली लेन्स व ट्रान्समिटर्स लावण्यात आले आहेत.
या रोबोटला चार पाय असून रचना श्वानांप्रमाणे आहे. शत्रुला शाेधून त्यांना संपिवण्याचा युद्धाभ्यास करण्यात आला आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये? - १० किलोमीटर अंतरावरून नियंत्रित करणे शक्य आहे. थर्मल कॅमेरे, रडार आणि शक्तिशाली ट्रान्समीटरने सज्ज. कॅमेरा ३६० अंशात वळविणे आणि झूम करण्यास सक्षम आहे.
शत्रुच्या ठिकाणांवर गोळीबार करण्याची क्षमता या रोबोटिक श्वानाची आहे. ४० ते ५५ अंश सेल्सिअस अंश तापमानात करण्यास हा रोबोटिक श्वान सक्षम आहे.
१ तास चार्ज केल्यानंतर हा रोबोटिक श्वान १० तास काम करु शकतो. १५ किलो वजन उचलण्याची क्षमता या रोबोटिक श्वानाची आहे, हे विशेष.