UIDAI नं रद्द केली ६ लाख Aadhaar कार्ड, पाहा का उचललं सरकारनं हे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 02:13 PM2022-07-22T14:13:10+5:302022-07-22T14:20:00+5:30

Aadhaar Card News: सध्या आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. दरम्यान, सरकारनं सहा लाख आधार कार्डांबाबत मोठं पाऊल उचललं आहे.

सध्या आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी आधार कार्डाची आपल्याला आवश्यकता भासते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्डाची आवश्यकता आहे.

काही काळापासून सरकारकडे डुप्लिकेट आधार कार्डाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. यावर कारवाई करत, आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने कठोर पाऊल उचलत ५,९८,९९९ आधार कार्ड रद्द केली आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, डुप्लिकेट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी UIDAI सातत्याने पावले उचलत आहे. यासोबतच हे रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देताना ते म्हणाले की, आता आधार कार्डमध्ये 'फेस' व्हेरिफिकेशनची सुविधा जोडण्यात आली आहे.

म्हणजेच आता आधार कार्ड पडताळणीसाठीही चेहराही वापरला जाणार आहे. यापूर्वी आधार कार्डाच्या पडताळणीसाठी आतापर्यंत फक्त बोटांचे ठसे आणि डोळ्यांचा वापर केला जात होता.

चंद्रशेखर यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आधारशी संबंधित सेवांचा दावा करणाऱ्या बनावट वेबसाइट्सना UIDAI कडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच या वेबसाइट्सच्या होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडरला त्या तात्काळ ब्लॉक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

जानेवारी 2022 पासून सरकारने अशा 11 वेबसाइट्सना आधार कार्डची सेवा देण्यापासून ब्लॉक केले आहे. यापैकी कोणत्याही वेबसाइटवर कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नोंदणी करण्याचा, बायोमेट्रिक बदलण्याचा आणि मोबाइल नंबर बदलण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकांना त्यांच्या आधार कार्डमधील पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यांना आधार कार्ड केंद्र किंवा UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल, असंही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं.