नरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार' By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:29 PM 2019-05-28T17:29:00+5:30 2019-05-28T17:36:20+5:30
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा अत्यंत जोमाने मांडला आणि त्याचं गोड फळ भाजपाला मिळालं. 'अब की बार, तीन सौ पार' हा त्यांचा नारा 'एअर स्ट्राईक'मुळे साकार झाला. म्हणजेच, पाकिस्तानशी नीडरपणे दोन हात करू शकणारं सरकार, ही प्रतिमा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. ही जनभावना लक्षात घेऊनच, मोदी सरकार 2.O स्थापन करण्याआधीच मोदींनी पाकिस्तानला 'जोर का झटका' देत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
एनडीएचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेले नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, त्यावेळी SAARC राष्ट्राच्या प्रमुखांना सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं. स्वाभाविकच, त्यात भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानचाही समावेश होता. परंतु, यावेळी त्यांनी BIMSTEC मधील देशांना आमंत्रित केलं आहे. त्यात म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, थायलंड आणि भूतान या देशांचा समावेश होतो.
पाकिस्तानबाबत आपल्या सरकारची भूमिका अगदी रोखठोक असेल, जोपर्यंत ते अडमुठेपणा करत राहतील, दहशतवाद्यांना पोसत राहतील, तोवर आमचा पवित्राही आक्रमकच असेल, असे स्पष्ट संकेत नरेंद्र मोदींनी दिले आहेत.
आधीच्या कार्यकाळात, सुरुवातीच्या सत्रात नरेंद्र मोदींनी स्वतःहून पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात केला होता. नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी तर ते अचानक लाहोरला गेले होते. त्यावरून बरीच टीकाही झाली होती. पण, तो त्यांच्या कूटनीतीचा भाग होता, असंच म्हणावं लागेल. भारताने पूर्ण प्रयत्न करून पाहिले, पण पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे, हे जगाला पटवण्यात ही कूटनीती यशस्वी ठरली. म्हणूनच, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तान एकाकी पडला, जग भारतासोबत उभं राहिलं.
यावेळी मात्र पाकिस्तानबाबत मोदी वेगळ्या मूडमध्ये आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना अभिनंदनाचा फोन केला, तेव्हाही त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून त्यांना ठणकावलं. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, या भूमिकेवर ते ठाम आहेत. म्हणूनच, पाकिस्तानला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रणही नाही.
BIMSTEC ही बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या देशांची संघटना आहे. तिचं मुख्यालय ढाकामध्ये आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर या संघटनेतील देश भारताच्या पाठीशी भक्कम उभे राहिले होते. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकतात.