Coronavirus : पश्चिम बंगालमध्ये आंशिक लॉकडाऊन; अनेक राज्यांमध्येही निर्बंधही वाढले By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:30 AM 2022-01-04T11:30:25+5:30 2022-01-04T11:46:10+5:30
कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गाबाबत (Coronavirus Pandemic) राज्य सरकारे (State Governments) सतर्क झाली आहेत. कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गाबाबत (Coronavirus Pandemic) राज्य सरकारे (State Governments) सतर्क झाली आहेत. पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी सरकारने (Mamta Banerjee) आंशिक लॉकडाऊन लागू केले आहे.
निवडणूक आयोगानेदेखील राज्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये रोड शो आणि रॅलींना बंदी घातली आहे. बिहारमध्ये सतर्कता आणि कठोर नियम दोन्ही वाढवण्याची तयारी सुरू आहे. मध्य प्रदेश आणि झारखंडनेही निर्बंध वाढवले आहेत.
बंगालमधील सर्व शैक्षणिक संस्थांसह प्राणीसंग्रहालय, पर्यटन स्थळे आणि इतर गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयात कर्मचाऱ्यांची हजेरी ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोकल ट्रेन रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावतील.
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे नवंवर्ष साजरे करण्यासाठी आलेल्या ४३ वर्षीय इटालियन महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात वाढत्या संसर्गामुळे ज्योतिर्लिंग महाकाल मंदिराच्या गर्भगृह आणि नंदीमंडपातील भाविकांचा प्रवेश १० जानेवारीपर्यंत बंद करण्यात आलाय.
केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कमी ऑक्सिजन लेव्हलमुळे त्यांना गाझियाबादच्या कौशांबी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे त्यांचे स्वीय सचिव राजू मौर्य यांनी सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये जेवण सप्लाय करणाऱ्या हॉटेलचे पाच कर्मचारी, तीन हवालदार आणि सहा तक्रारदारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या सर्वांची आता कोरोनाची तपासणी होणार आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य, खासगी सचिव आणि सुरक्षा रक्षक, १८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजचे ७० डॉक्टर, चित्तरंजन सेवा सदन आणि शिशु सदन हॉस्पिटलचे २४ डॉक्टर आणि रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजीच्या १२ डॉक्टरांना २४ तासांत संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोलकाता विमानतळावर १६ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
झारखंडमध्ये सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, उद्याने, प्राणीसंग्रहालय, पर्यटन स्थळे, जलतरण तलाव आणि क्रीडा स्टेडियम १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांसह चालणार असल्याचंही यावेळी ठरवण्यात आलं.