लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:29 PM 2024-10-13T12:29:32+5:30 2024-10-13T12:35:20+5:30
gangster lawrence bishnoi : दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई गँगनेही किरकोळ गुन्ह्यांची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं स्वतःची गँग तयार केली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सातत्यानं कारवाई करत आहे. दरम्यान, एनआयएनं गँगस्टर टेरर प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार यांच्यासह अनेक कुख्यात गँगस्टरवर आरोपपत्र दाखल केले आहेत. आरोपपत्रात एनआयएनं अनेक मोठे खुलासे केले आहेत.
एनआयएनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टेरर सिंडिकेटचा मोठ्या पद्धतीने विस्तार झाला आहे. दाऊद इब्राहिमनं ९० च्या दशकात छोटे-मोठे गुन्हे करून आपले नेटवर्क तयार केलं होतं, त्याच पद्धतीनं लॉरेन्स बिश्नोईनेही आपलं नेटवर्क तयार केलं आहे. दाऊद इब्राहिमनं अंमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंग, खंडणी रॅकेटच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभं केलं आणि मग त्यानं डी कंपनी स्थापन केली.
त्यानंतर दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून आपलं नेटवर्क वाढवलं. तर दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई गँगनेही किरकोळ गुन्ह्यांची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं स्वतःची गँग तयार केली. आता बिष्णोई गँगनं उत्तर भारताचा ताबा घेतला आहे. सतविंदर सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा कॅनडाच्या पोलीस आणि भारतीय एजन्सीला हवा आहे, तो बिश्नोई गँग चालवत आहे.
एनआयएनं सांगितलं की, बिश्नोई गँगमध्ये ७०० हून अधिक शूटर्सआहेत, त्यापैकी ३०० पंजाबशी संबंधित आहेत. बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. बिष्णोई गँगनं २०२०-२१ पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले आणि तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठवला गेला.
एनआयएनुसार, बिश्नोईची गँग एकेकाळी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण त्यानं जवळचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या गँगशी हातमिळवणी करून मोठी गँग तयार केली. बिश्नोई गँग आता उत्तर भारत, पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे.
सोशल मीडिया आणि इतर विविध मार्गांनी तरुणांना गँगमध्ये भरती केलं जातं. ही गँग अमेरिका, अझरबैजान, पोर्तुगाल, यूएई आणि रशियामध्ये पसरली आहे. तरुणांना कॅनडा किंवा त्यांच्या आवडीच्या देशात पाठवण्याचं आमिष दाखवून त्यांना गँगमध्ये भरती केलं जातं. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई गँगच्या शूटर्सचा वापर करतो.
काही दिवसांपूर्वी एनआयएनं लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार यांच्यासह एकूण १६ गुंडांच्या विरोधात UAPA अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गोल्डी ब्रार कॅनडा, पंजाब आणि दिल्लीतील गँग हाताळतो. रोहित गोदारा राजस्थान, मध्य प्रदेश आणि अमेरिकेतील गँगवर देखरेख करतो. तर अनमोल बिश्नोई पोर्तुगाल, यूएसए, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील गँग नियंत्रण ठेवतो. त्याचवेळी काला जथेडी हरयाणा आणि उत्तराखंडमधील गँग हाताळते.
या संपूर्ण गँगचा रिपोर्ट थेट साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला दिला जातो. या गँगची शस्त्रे मध्य प्रदेशातील माळवा, मेरठ, मुझफ्फरनगर, यूपीमधील अलीगढ आणि बिहारमधील मुंगेर, खगरिया येथून येतात. याशिवाय पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब जिल्ह्यातूनही या गँगकडे शस्त्रे पोहोचतात. याशिवाय, या गँगला पाकिस्तान, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधूनही शस्त्रे मिळतात.