नीरव मोदीच्या आलिशान कारचा ऑनलाईन लिलाव; पोर्शे-रोल्स रॉयसही विकणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:39 PM 2019-04-01T14:39:21+5:30 2019-04-01T14:48:45+5:30
पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार हिरेव्यापारी नीरव मोदीच्या घरातील पेंटिंग्ज विकल्यानंतर आता त्याच्या ताफ्यातील 13 आलिशान कारही आयकर विभाग विकणार आहे. ही लिलाव प्रक्रिया 18 एप्रिलला होणार आहे.
आयकर विभागाने नुकतीच नीरव मोदीच्या बंगल्यातील महागडी पेंटिंग्ज लिलावात विकली होती. याद्वारे 54.84 कोटी रुपये जमविण्यात आले. आता कारच्या लिलावातून काही पैसा गोळा करण्याचा प्रयत्न ईडीचा आहे.
नीरव मोदीच्या या गाड्यांचा लिलाव मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएसटीसी) करणार आहे. तर लिलाव करण्यात येणारी वाहने केवळ पाहता येणार आहेत, त्यांचे टेस्ट ड्राईव्ह करता येणार नाही. पुढील आठवड्यात या गाड्यांची माहिती एमएसटीसीच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे. गाड्यांची सर्व माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
ज्या गाड्यांचा लिलाव होणार त्यामध्ये रोल्स रॉयस घोस्ट, पोर्श पनेरा, दोन मर्सिडीज बेंझ, तीन होंडाच्या कार, टोयोटा फॉर्च्युनर आणि इनोव्हा कार आहेत. या गाड्या उत्तम ठेवण्यात आलेल्या आहेत.
लिलावामध्ये बोली जिंकल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी काही वेळ दिला जाणार आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या वैंड्सवर्थ तुरुंगात आहे. वेस्टमिनिस्टर न्यायालयाने त्याचा दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.