Toll Plaza: भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’ By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:48 AM 2021-08-12T09:48:31+5:30 2021-08-12T09:54:53+5:30
Toll Plaza: येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. देशभरातील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यातून हायवेवर केली जाणारी टोलवसुली वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रात मनसेने टोल आकारणीविरोधात आंदोलनही केले होते. (Toll Plaza)
टोल नाक्यांमुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेवरूनही अनेकदा संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. त्यात फास्ट टॅग यंत्रणा राबवल्यानंतरही टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय ठरत आहे. (toll plazas on highway)
केंद्रीय रस्ते वाहूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली असून, केंद्राची ही योजना कार्यान्वित झाल्यास टोलनाके आणि तेथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या कटकटीतून सर्वसामान्यांची सुटका होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकार टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असून, आगामी तीन महिन्यात ही योजना प्रत्यक्षात येऊ शकते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल. यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही, तर केवळ टोलनाके हटवणे असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल, तेव्हा जीपीएसच्या मदतीने कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसेच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार ,वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे. जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यात यावर धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत ही योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, टप्प्याटप्प्याने हायवेवरील सर्व टोलनाके बंद करण्यात येतील. ही यंत्रणा यानंतर जीपीएस प्रणालीवर चालेल, असे गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, टोल नाक्यांवर टोल वसुलीवेळी वाहनांच्या लागत असलेल्या रांगांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर FASTag ची सुविधा सुरू केली आहे. यामुळे लाईनमध्ये न लागताच ऑटोमॅटिक पद्धतीने टोलनाक्यांवर टोल भरता येऊ शकतो.
पायाभूत सुविधांचा विकास हा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि महामार्ग बांधकामात प्रतिदिन १०० किमी एवढा वेग गाठणे हे आपले लक्ष्य आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही एका दिवसात ३८ किमी रस्ता बनवून विश्वविक्रम केला.
मी सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. माझे लक्ष रोज १०० किलोमीटर महामार्ग बांधणीचे आहे. एवढेच नाही, तर सरकारचा प्रयत्न कालबद्ध, लक्ष्य केंद्रित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आहे, असेही गडकरी म्हणाले.
अधिकाऱ्यांना विचारतो की, जर एखाद्या कंत्राटदाराला आपली बँक अथवा वित्तीय संस्था बदलायची असेल, तर त्याला एनएचएआयकडून एनओसी मिळवण्यासाठी ३ महिने ते १.५ वर्षांचा कालावधी लागतो. हे आपण २ तासांत शक्य करू शकतो. मग याला १.५ वर्षांचा कालावधी का लागते, अशी सवालही गडकरींनी केला होता.