नितीश कुमार बाहेर पडले तर मोदींचा २०२४ साठीचा 'प्लान बी' काय?, भाजपाची डोकेदुखी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 03:56 PM2022-08-08T15:56:16+5:302022-08-08T16:09:35+5:30

मान्सूनच्या विलंबामुळे बिहारच्या हवामानासह राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे. यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार आता एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण तसं झालंच तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२४ साठीचा 'प्लान बी' देखील तयार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बिहारच्या राजकीय खेळपट्टीवर फक्त मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयू जोरदार फलंदाजी करत आहे. बाकी सर्व पक्ष इच्छा असूनही काही करू शकत नाहीत. अमाप संपत्ती जमा केल्याप्रकरणी उमेश कुशवाह यांनी जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं राजकीय आंदोलनाला सुरुवात झाली.

आरसीपी सिंह यांनी जेडीयूचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आणि जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांनी नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केल्यानं आंदोलन आणखी तीव्र होत आहे. 12 ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये सत्तेचे भागीदार बदलू शकतात, असं वृत्त आहे. प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीचे नेते उघडपणे सांगत आहेत की नितीश कुमार भाजपपासून वेगळे झाले तर ते त्यांना उघडपणे पाठिंबा देतील. दरम्यान, नितीश कुमार यांनी एनडीएपासून वेगळे होऊन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार बनवलं, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

नितीश यांनी 2013 सालची पुनरावृत्ती केली तर २०१५ च्या निवडणुकीच्या निकालांची २०२४ मध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणती योजना आहे? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० आणि विधानसभेच्या २४३ जागा आहेत. बिहार विधानसभेची स्थिती पाहिली तर राजद ८०, भाजप ७७, जेडीयू ४५, काँग्रेस १९, डावे १६, एचएएम ४, एआयएमआयएम १ आणि १ अपक्ष आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या अपात्रतेमुळे 'राजद'चा एक आमदार कमी झाला आहे. लोकसभेत बिहारमधून भाजपचे १७, जेडीयूचे १६ आणि एलजेपी (पशुपती पारस) ५, एलजेपी (चिराग पासवान) आणि काँग्रेसचा एक खासदार आहेत. लालू यादव यांच्या 'राजद'कडे एकही खासदार नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार भाजपपासून वेगळे होऊन महाआघाडीसोबत गेले तर याचे परिणाम समजून घेण्यासाठी 2015 ची बिहार विधानसभा निवडणूक पाहावी लागेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी, जेडीयू आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. 2014 मध्ये भाजपने 30 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यात 22 जागा जिंकल्या होत्या. त्याचप्रमाणे, एनडीएचा घटक म्हणून, एलजेपीने 7 पैकी 6 जागा जिंकल्या. काँग्रेसने 12 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यांना फक्त दोन जागा मिळाल्या होत्या, तर 27 जागांवर लढलेल्या 'राजद'ला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने 38 जागा लढवल्या, पण फक्त 2 जागा जिंकल्या.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने पूर्ण ताकद लावूनही फारसे चांगले परिणाम दाखवले नाहीत. लालू-नितीश जोडीवर लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला होता. पीएम मोदींच्या सभा असूनही, महाआघाडीने 243 पैकी 178 जागा जिंकल्या होत्या, ज्यामध्ये आरजेडीचे 80, जेडीयू 71 आणि काँग्रेसचे 27 आमदार होते. दुसरीकडे, एनडीएमध्ये मजबूत जातीय समीकरण असूनही, भाजपला 53 जागा, एलजेपी आणि आरएलएसपी (उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष) 2-2 आणि जीतन राम मांझी यांना एक जागा मिळाली. संपूर्ण एनडीएला केवळ 58 जागा जिंकता आल्या होत्या.

2005 नंतर बिहारमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आहेत, त्यातील निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा जेव्हा दोन मोठे पक्ष एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा जनतेचा पाठिंबा त्यांना जातो. या दृष्टिकोनातून असा अंदाज लावला जाऊ शकतो की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र आले तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा धक्का बसू शकतो. येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की यावेळी जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह हे देखील नितीश कुमार यांच्यासोबत आहेत.

केंद्रीय राजकारणाची समज असणाऱ्यांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ८० आणि बिहारमधील ४० जागा दिल्लीत कोणतं सरकार बसणार हे ठरवतं. कारण या दोन राज्यांचे मिळून १२० खासदार आहेत. तर लोकसभेत पूर्ण बहुमतासाठी २७२ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या यूपीमधून एनडीएचे ६६ खासदार आहेत. त्याच वेळी, मोदी सरकारला बिहारमधील १०५ खासदारांचा पाठिंबा आहे.

2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा आधार घेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची जोडी एनडीएला मोठा धक्का देऊ शकते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर महाआघाडीने बिहारमध्ये 40 पैकी 34 किंवा 35 जागा जिंकल्या आणि NDA 5 किंवा 6 जागांवर घसरला तर मोदी सरकारचा ताण वाढू शकतो.

सर्वसामान्यांचा सध्याचा मूड पाहता त्यांचा मोदी सरकारवर अतूट विश्वास आहे, यात शंका नाही. देशातील मोठ्या लोकसंख्येला मोदी सरकार आवडतं. पण महागाई आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काही परिणाम दाखवू शकतात हे नाकारता येणार नाही. अशा स्थितीत 2014 आणि 2019 च्या तुलनेत बिहार व्यतिरिक्त देशभरात भाजपच्या जागा 20-25 ने कमी झाल्या आणि महाआघाडीला बिहारमध्ये 34-35 जागा मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

उदाहरणार्थ, 272 पैकी बिहारमधील 35 जागा आणि देशभरातील 25 जागा वजा केल्यास ही संख्या 212 जागा होईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) देखील एनडीएमध्ये होते, परंतु आता ते देखील वेगळे झाले आहेत. म्हणजेच नितीशकुमार यांनी एनडीएपासून वेगळे होऊन तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी केली तरच मोदी सरकारचे दूरगामी नुकसान होऊ शकते. तात्कालिक परिणाम पाहता बिहारसारखे महत्त्वाचे राज्य भाजपच्या हातून जाईल.