भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 03:47 PM 2020-12-23T15:47:25+5:30 2020-12-23T16:04:10+5:30
२०२० वर्ष आता संपत आलंय. वर्ष संपण्यास आता केवळ आठवडा उरला आहे. चालू वर्षांत कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळालं. कोरोना संकटामुळे संपूर्ण जगच मेटाकुटीला आलं.
कोरोनामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केला. त्यामुळे जवळपास सारं जग थांबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आताही युरोपातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.
भारतातही मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर अनलॉकला सुरुवात झाली. मात्र ज्यामुळे संपूर्ण जग थांबलं, त्या कोरोनाबद्दल भारतीयांनी गुगलवर बरंच सर्च केलेलं असलं, तरीही कोरोना विषाणू गुगलच्या सर्वाधिक सर्च यादीत पहिल्या स्थानी नाही.
कोरोना काळात अनेकांनी त्याची लक्षणं, धोके याची माहिती मिळवण्यासाठी गुगलचा आधार घेतला. मात्र सगळ्या जगाला मेटाकुटीला आणणारा कोरोना भारतात गुगल सर्चमध्ये पहिल्या क्रमांकावर नाही.
पहिल्या क्रमांकावर अर्थातच भारतीयांचं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटचा क्रमांक लागतो. २०२० मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबद्दल सर्वाधिक सर्च केलं.
आयपीएलनंतर सर्वाधिक सर्चमध्ये कोरोना व्हायरसचा नंबर लागतो. त्यानंतर अमेरिकन निवडणूक निकाल, पंतप्रधान किसान सन्मान निधी, बिहार निवडणूक निकाल आणि दिल्ली निवडणूक निकाल याबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आलं.
निर्भया प्रकरण, लॉकडाऊन, भारत-चीन तणाव आणि राम मंदिर हे विषयदेखील टॉप-१० सर्चमध्ये आहेत.
सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींचा विचार केल्यास ज्यो बायडन पहिल्या क्रमांकावर आहेत. ज्यो बायडन यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.
ज्यो बायडन यांच्यानंतर भारतीयांनी पत्रकार अर्णब गोस्वामींबद्दल सर्वाधिक सर्च केलं. इंटिरियन डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब यांना अटक केली होती.
अर्णब यांच्यानंतर भारतीयांनी गुगलवर गायिका कनिका कपूर, उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग ऊन, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केलं.
याशिवाय अभिनेत्री कंगना राणौत, रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे यांच्याबद्दल जाणून घेण्यातही भारतीयांना रस होता, असं गुगल सर्चची आकडेवारी सांगते.