सिसोदियाच नाही तर सत्ता आल्यापासून आपचे हे नेते गेले तुरुंगात, आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांचा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:31 AM 2023-02-27T09:31:59+5:30 2023-02-27T09:36:51+5:30
Manish Sisodia Arrest: सुमारे १०-११ वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या संघटनेचा वेगाने विस्तार केला आहे. मात्र या काळात आम आदमी पार्टी वादविवादांपासून ते घोटाळ्यांपर्यंत चर्चेत राहिली आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये आपच्या ५ मंत्र्यांना अटक झाली आहे. सुमारे १०-११ वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या संघटनेचा वेगाने विस्तार केला आहे. मात्र या काळात आम आदमी पार्टी वादविवादांपासून ते घोटाळ्यांपर्यंत चर्चेत राहिली आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये आपच्या ५ मंत्र्यांना अटक झाली आहे.
काल अबकारी नीती प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दुसरे मोठे नेते मानले जातात. याआधी अटकेची कारवाई झालेल्या आपच्या नेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
सत्येंद्र जैन केजरीवाल सरकारमध्ये आरोग्यमंत्री अससलेल्या सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली होती. त्यांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. जैन यांच्या कुटुंबातील काही सदस्य हे अशा कंपन्यांशी संबंधित होते ज्यांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू आहे. तसेच जैन यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोपही झाला होता.
संदीप कुमार आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री असलेले संदीप कुमार हे २०१६ मध्ये रेशन कार्ड बनवण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये अडकले होते. या प्रकरणात त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती. या घटनेची एक सीडीही समोर आली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
जितेंद्र सिंह तोमर २०१५ मध्ये दिल्ली सरकारमधील कायदेमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर वकिलीची खोटी पदवी मिळवल्याचा आरोप होता. माहितीच्या अधिकारामधून जितेंद्र सिंह यांची पदवी खोटी असल्याचे समोर आले होते.
विजय सिंगला पंजाब सरकारमधील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणाात अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर आरोग्य विभागाशी संबंधित टेंडरमध्ये एक टक्का कमिशन मागितल्याचा आरोप झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हटवले होते. सिंगला हे सात वर्षांपूर्वी आपमध्ये आले होते.
आसिम अहमद खान केजरीवाल सरकारमधील मंत्री आसिम अहमद खान यांचं नावही २०१८ मध्ये एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढे आलं होतं. तेव्हा केजरीवाल यांनी खान यांना मंत्रिमंडळातून हटवले होते. आसिम यांच्यावर सहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप झाला होता.
सोमनाथ भारती आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती हे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. २०१३ मध्ये त्यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्याविरोधात द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. अटकेपासून वाचण्यासाठी ते हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले होते.
अमानतुल्ला खान आपचे आमदा अमानतुल्ला खान सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. गेल्या वर्षी खान यांना वक्फ बोर्डाच्या कामकाजामध्ये गडबड केल्याच्या आरोपाखाली त्यांना एसीबीने अटक केली होती. याबाबत एसीबीने जानेवारी २०२० मध्ये भ्रष्टाचार निवारण अधिनियम आणि भारतीय दंडविधानातील विविध तरतुदींतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकाश जारवाल आपचे देवली येथील आमदार प्रकाश जारवाल यांच्यावर सन २०१७ मध्ये एका ५३ वर्षीय महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये ते दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण केल्याच्या आरोपामध्ये फसले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.