आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही; दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:43 IST2025-03-18T18:54:31+5:302025-03-18T19:43:00+5:30
नवीन मोटार वाहन दंड २०२५ नुसार, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो .

तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम तोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे. कारण नवीन मोटार वाहन दंड २०२५, १ मार्च २०२५ पासून लागू झाला आहे. दंडाव्यतिरिक्त, तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे.
जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला १००० रुपये दंड आकारला जाईल. यासोबतच, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. पूर्वी, जर तुम्ही ही चूक केली तर १०० रुपये दंड आकारला जात होता. जर दोन पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला १००० रुपये द्यावे लागतील.
सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी यासाठी १०० रुपयांची तरतूद होती. दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला ५०० रुपयांऐवजी तुम्हाला ५००० रुपये दंड द्यावा लागेल.
वाहन चालवत असतानाजर कोण फोनवर बोलत असेल तर यासाठी ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास ५,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
मद्य पिऊन गाडी चालवत असेल तर १०,००० रुपये दंड आणि/किंवा ६ महिने कारावासाची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास, १५,००० रुपयांपर्यंत दंड आणि/किंवा २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला १०,००० रुपये दंड भरावा लागेल.
जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड द्यावै लागणार आहे. तसेच जर तुम्ही इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला २००० रुपये दंड आणि/किंवा तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो.
जर मूल १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला २५,००० रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील १ वर्षासाठी रद्द केली जाईल. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.