...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:36 PM 2020-07-13T19:36:26+5:30 2020-07-13T20:13:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अजित डोवाल यांची राष्ट्रिय सुरक्षा सल्लागारपदी (एनएसए) नियुक्ती करण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून डोवाल २००५ साली निवृत्त झाले होते. पाच वर्षे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कामगिरी बजावल्यांनतर अजित डोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. (साभार - अजित डोवाल: एका गुप्तहेराची मुत्सद्देगिरी, लेखक: अविनाश थोरात)
अजित डोवाल केवळ मुत्सदेगिरी करणारे अधिकारी नाहीत तर प्रत्यक्ष गुप्तहेर म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्यानंतर डोवाल यांनी केरळ केडरमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम केले. आठ वर्षानंतर पोलीस दलातील सुखासिन नोकरी सोडून ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये गेले.
पहिल्याच कामगिरीत त्यांची नियुक्ती मिझोराममध्ये झाली होती. या ठिकाणी त्यांनी मिझो बंडखोरांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. मिझो बंडखोरांचे नेते लालडेंगा यांच्याशी त्यांनी अत्यंत जवळचे संबंध निर्माण केले होते. डोवाल हे मिझो नॅशनल आमीर्चे अत्यंत खतरनाक बंडखोर आहेत, असेच आम्हाला सुरुवातीला वाटले. त्यामुळे लष्कराने त्यांना संपविण्याचीही तयारी केली होती. मात्र, एके दिवशी मला सांगण्यात आले, की हा आपलाच माणूस आहे, अशी आठवण लेफ्टनंट कर्नल जे. आर. जेकब सांगतात. मात्र, डोवाल यांनी मिझो बँडखोरांमध्येच फुट पाडली. लालडेंगा यांच्यासोबतच्या नेत्यांना आपल्यासोबत वळवून घेतले. त्यामुळे लालडेंगा यांनी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी करार केला.
सिक्कीम हे राज्य भारतात सामील करून घेण्यात अजित डोवाल यांची भूमिका महत्वाची ठरली. मिझोराम आणि सिक्कीममधील कामगिरीसाठी अजित डोवाल यांचा राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. १४ वर्षांची सेवा झाल्यानंतरच हा सन्मान द्यायचा असा नियम आहे; परंतु डोवाल यांच्या शूरपणाला सलाम करण्यासाठी तत्कालीन राजीव गांधी सरकारने या नियमात बदल केला. केवळ सात वर्षांच्या सेवेतच डोवाल यांनी हा मानाचा सन्मान मिळविला होता.
अजित डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले. तेथे जाण्यापूर्वी त्यांना कुराणाचा अभ्यास करावा लागला. मुस्लीम धर्मग्रंथांची माहिती घ्यावी लागली. मुस्लीम आचारविचार, पेहराव, चालीरीती आत्मसात कराव्या लागल्या. हिंदू मानसिकता संपूर्ण बदलून टाकावी लागली. पाकिस्तानमध्ये ते रिक्षाचालकाचे काम करत होते. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीमध्ये ते राहत होते.
पाकिस्तानात एके दिवशी मशिदीत गेले असताना एक मौलवी म्हणाला की तुम्ही हिंदू आहात. डोवाल यांनी आपण मुस्लिमच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो मौलवी डोवाल यांना आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला. त्याने सांगितले, की आपणही हिंदू आहोत. त्याच्या संपूर्ण परिवाराची हत्या करण्यात आली. त्यामुळे जगण्यासाठी मुस्लीम म्हणून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याने कपाटातून शंकर आणि दुगेर्ची मूर्ती काढली. आपण अजूनही हिंदू देवतांची पूजा करतो, असेही त्याने सांगितले. डोवाल यांनी विचारले, की ते हिंदू असल्याचे त्यांनी कसे ओळखले? यावर फकिराने सांगितले, की डोवाल यांचे कान टोचलेले आहे. त्यांच्या कानाच्या पाळ्यांवर भोके आहेत. डोवाल त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून घेण्याचा सल्ला त्याने दिला. पुढे डोवाल यांनी हा सल्ला मानलाही.
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अॉपरेशन ब्लू स्टार मोहीम राबवली. मात्र परिस्थिती आणखीनच चिघळली. त्यामुळे राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत सरकारला आणखी एक कारवाई करावी लागली. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असलेले अजित डोवाल खलिस्तानवादी दहशतवाद्यामध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट म्हणून सामील झाले होते. तेव्हा त्यांनी हाताळलेल्या परिस्थितीमुळे रक्ताचा एक थेंब न सांडता सुरक्षा दलांना कारवाई पूर्ण करता आली आणि 'आॅपरेशन ब्लॅक थंडर' यशस्वी झाले.
काश्मीरमध्ये १९९०च्या दशकात इंटेलिजन्स ब्यूरोचे सहसंचालक म्हणून अजित डोवाल कामकरीत होते. त्यावेळी शंभरावर दहशतवादी संघटना कार्यरत होत्या. काश्मिरी लोकगीत गायक असलेला मोहंमद युसूफ पॅरी ऊर्फ कुक्का पॅरीही दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता. अजित डोवाल यांनी प्रभावी संवादकौशल्याने कुक्का पॅरीचे मतपरिवर्तन केले. कुक्का पॅरीने दहशतवादाचा मार्ग सोडला. केवळ एवढेच नव्हे, तर डोवाल यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली. या काळात डोवाल आणि कुक्का पॅरीच्या प्रयत्नांतून अनेक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
अजित डोवाल इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक असताना कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला संपविण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदची मुलगी महरुख आणि पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जावेद मियॉँदाद याचा मुलगा जुनैद यांचा विवाह होणार होता. दाऊद आणि छोटा राजन गँगमधील दुष्मनीचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरविले. छोटा राजन गँगचे विकी म्हल्होत्रा आणि फरीद तानशा यांना त्यांनी हेरले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुबईला जाऊन त्यांनी दाऊदला उडविण्याअगोदर दोन आठवडे अजित डोवाल या योजनेवर अखेरचा हात फिरवत होते. मात्र, तोपर्यंत ते इंटेलिजन्स ब्युरोमधून निवृत्त झाले होते. ग्रँड हयात हॉटेलची ब्लू प्रिंट देऊन सगळी योजना तयार केली. मात्र, अचानक मुंबई पोलिसांनी येऊन हॉटेलवर छापा घातला. म्हल्होत्रा आणि फरीदला अटक करून ते मुंबईला घेऊन गेले. त्यामुळे आॅपरेशन दाऊद होऊ शकले नाही. त्यामुळेच दाऊद डोवाल यांना सर्वाधिक घाबरतो, असे म्हणतात.
नागा बंखोरांनी २०१५ मध्ये भारताच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये २० जवान शहीद झाले होते. या बंडखोरांचे दहशतवादी तळ म्यानमारमध्ये होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांनी हे तळच उध्दवस्त करण्याची भूमिका मांडली. त्यासाठीची योजनाही तयार केली. लष्कराच्या २१, पॅरा कमांडोंवर हल्ल्याची जबाबदारी सोपविली. यासाठी बंडखोरांच्या प्रशिक्षण तळाच्या हुबेहूब प्रतिकृती बनविण्यात आल्या. या ठिकाणी कमांडोंनी मॉकड्रिल केले. विमानातून तीन टीमद्वारे कमांडो म्यानमारच्या सीमेमध्ये सुमारे आठ किलोमीटर आत घुसले. तळाला चारही बाजूंनी वेढून त्यांनी अचानक हल्ला चढविला. बहुतांश दहशतवाद्यांना ठार करून रॉकेट लांचरच्या साह्याने त्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
डोकलाम येथे २०१७ साली चीनबरोबर भारताचा संघर्ष झाला होता. या वेळी अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कल्पनेतूनच भारताने जपान, दक्षिण कोरिया, फिलीपाईन्स, व्हिएतनाम आणि आॅस्ट्रेलिया या देशांची आघाडी तयार केली.
भारताने स्वीकारलेल्या या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे चीनलाही विचार करण्याची वेळ आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. भारताची कडक भूमिका आणि प्रसंगी सीमेवर सैन्य तैनात करण्याची तयारी यामुळे चीननेही माघार घेतली. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराचा तळ आहे. १८ सप्टेंबर २०१६ रोजी येथे चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. १८ जवान यामध्ये शहीद झाले. या हल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या सर्जीकल स्ट्राईकची सर्व योजना अजित डोवाल यांनी आखली होती. रॉ, मिलिटरी इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स ब्यूरो या तीनही गुप्तचर संस्थांशी त्यांनी समन्वय साधला. डीआरडीओसारख्या लष्करी संशोधन संस्थेकडून हेरगिरीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून घेतली. त्यांच्या सहाय्याने सर्जीकल स्ट्राईक करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले.
पुलवामा येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला आणि दहशतवाद्यांच्या कृत्याला कठोर उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर देण्यात आली. देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीमध्येच बसून हा हल्ला प्रत्यक्ष पाहिला. हवाईदलाचे नेत्र हे विमान जणू महाभारतातील संजयाप्रमाणे त्यांचे डोळे बनले. पाकिस्तानात अतिरेकी तळ असल्याचे सिध्द करून अजित डोवाल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला उघडे पाडले.
काश्मीरमधील ३७० आणि ३५ (२) ही कलमे रद्द झाल्यानंतर अजित डोवालांनी महत्वाची भूमिका पार पाडली. भारत सरकारच्या या निर्णयानंतर काश्मीरमध्ये जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून अजित डोवाल रस्त्यावर उतरले. जनतेशी संवाद साधला. शोपियासारख्या दहशतवादी भागात जाऊन नागरिकांबरोबर संवाद साधला. त्यामुळे काश्मीरी जनतेत असंतोष निर्माण करण्याची संधी दहशतवाद्यांना मिळाली नाही.
अजित डोवाल यांनी बचावात्मक आक्रमण म्हणजेच दहशतवाद्यांचा उगम जेथे होतो तेथेच त्यांना नेस्तनाबूत करा, असा सिध्दांत मांडला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना उरी हल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये केलेला हवाई स्ट्राईक हे डोवाल यांच्या सिद्धांताचे मोठे यश आहे.
नुकताच भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये एलएसीवर प्रचंड तणाव वाढला होता. भारत-चीन सैन्यात हिंसक झटापट झाली होती. दोन्ही बाजूंनी सैन्याची आणि युद्ध साहित्यांची जमवाजमवही सुरू झाली होती. मात्र, नंतर दोन्ही देशांत झालेल्या चर्चेतून हा तणाव कमी होऊन दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतले. यातही डोवालांची मोठी भूमिका होती.