CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 05:02 PM 2020-12-02T17:02:36+5:30 2020-12-02T17:24:37+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना चाचणीच्या दरात अनेक राज्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 94,99,414 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,38,122 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,604 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 501 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढत आहे.
मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. तसेच कोरोना चाचणीचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहे.
कोरोना चाचणीच्या दरात अनेक राज्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. याच दरम्यान ओडिशामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. RT-PCR test फक्त 400 रुपयांमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनाच्या RT-PCR चाचणीसाठी आतापर्यंत 2000 ते 2400 रुपये मोजावे लागत होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने मात्र खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचा दर 800 रुपये केला आहे.
दिल्लीनंतर आता राजस्थान आणि गुजरात सरकारनेही खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारने आरटी-पीसीआर चाचणीच्या दरात कपात करून 700 रुपये केली आहे.
ओडिशा सरकारने या सर्व राज्यांना मागे सोडत आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त कोरोना चाचणीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी फक्त 400 रुपये मोजावे लागतील.
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व खासगी लॅबधारकांना देखील याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीसाठी रुग्णांकडून 400 रुपयांपेक्षा अधिक पैसे घेता येणार नाहीत हे नमूद केलं आहे.
दिल्ली सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचा दर 2400 रुपयांवरून घटवून 800 रुपये केला आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गुजरातमध्ये ही कोरोना चाचणीच्या दरात घट पाहायला मिळाली आहे. आरटी-पीसीआर चाचणीसाठी लोकांना आता 800 रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकारनंतर आता ओडिशातही आरटी-पीसीआर चाचणीसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.