OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले' By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:30 PM 2020-07-02T12:30:37+5:30 2020-07-02T12:36:34+5:30
आरोग्य विभागाला या निष्काळजीपणाची जाणीव होताच त्यांचे धाबे दणाणले. मात्र, कोरोना नसलेली अलिजा ही तीन दिवस कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये राहिल्याने तिला डिस्चार्जही करता येत नाहीय. तिच्यावर संक्रमणाचे संकट आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तिला सोडून दुसऱ्याच तरुणीला कोरोनाच्या वॉर्डमध्ये बळजबरीने डांबल्याचा प्रकार घडला आहे.
शीशमहलचे रहिवासी आबिद इब्राहिम यांनी सांगितले की, त्यांची मुलगी अलिजा इब्राहीम ही नोएडामध्ये नोकरी करते. ती 3 जूनला लखनऊमध्ये परतली होती. जवळपास 20 दिवसांनी तिची तब्येत बिघडल्याने तिला चरक हॉस्पिटलमध्ये नेले होते.
तिथे उपचाराआधी कोरोना चाचणी करण्यास सांगण्यात आले. 28 जूनला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत अलिजाला लोकबंधु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी माझ्या सर्व कुटुंबाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे संशय आल्याने हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी गेल्यावर धक्काच बसला. माझ्या हाती अलिजा तबस्सुमचा रिपोर्ट ठेवण्यात आला.
आबिद यांनी मुलीचे नाव अलीजा तबस्सूम नसून इब्राहीम असल्याचे सांगताच हॉस्पिटल प्रशासनाची भंबेरी उडाली. यानंतर सीएमओ कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. तिथेही अलीजा तबस्सूम असे नाव यादीत असून आबिद इब्राहिम यांच्या नावाचा कुटुंबामध्ये उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.
तर दुसरीकडे अलिजा तबस्सुम नावाची महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याचे सीएमओकडून सांगण्यात आले.
आरोग्य विभागाला या निष्काळजीपणाची जाणीव होताच त्यांचे धाबे दणाणले. मात्र, कोरोना नसलेली अलिजा ही तीन दिवस कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये राहिल्याने तिला डिस्चार्जही करता येत नाहीय. तिच्यावर संक्रमणाचे संकट आहे.
यामुळे बुधवारी तिला लोकबंधु हॉस्पिटलमध्येच वेगळ्या खोलीमध्ये हलविण्यात आले आहे. आज तिची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास तिला सोडण्यात येणार आहे.
अलिजाला तीन दिवस कोविड हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात तिचे नावही विचारण्याची किंवा ओळखपत्र तपासण्याची तसदी घेण्यात आली नाही. तीन दिवसांनी तिचे सँम्पल घेण्यात आले आहे.
सीएमओनुसार तिचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तिला हॉस्पिटलमधूनच कोरोनाची लागण झाली नसेल कशावरून, असा सवाल तिच्या वडिलांनी विचारला आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले असून तिचे नाव बदलले गेले होते. मात्र, रिपोर्ट तिचाच होता. ती तरुणी कोरोना पॉझिटिव्हच आहे. हॉस्पिटलने या चुकीसाठी माफी मागितली आहे, असे लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.