चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 08:43 PM2021-12-10T20:43:00+5:302021-12-10T20:51:40+5:30

Omicron Cases In India : भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 32 प्रकरणे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ( Omicron variant) 32 रुग्ण आहेत. या रग्णांपैकी कोणत्याही रुग्णाला गंभीर लक्षणे नाहीत. यासंदर्भातील माहिती सरकारने ( central government) शुक्रवारी दिली.

दरम्यान, जगभरातील अनेक देश कोरोनाच्या या व्हेरिएंटबाबत सतर्क आहेत. भारतातही अनेक प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, देशातील प्रमुख विमानतळांवर सर्व प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

ओमाक्रॉनचा प्रादुर्भाव जगभर चिंताजनक आहे. आता आम्ही एका जोखमीच्या आणि अस्वीकार्य पातळीवर काम करत आहोत. लस आणि मास्क या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले.

तसेच, सरकारने सांगितले की ओमायक्रॉन व्हेरिएंटसाठी उपचार प्रोटोकॉल समान राहील. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, वैद्यकीयदृष्ट्या, ओमायक्रॉन अद्याप आरोग्य सेवा प्रणालीवर ताण नाही, परंतु दक्षता राखली पाहिजे.

भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 32 प्रकरणे नोंदवली आहेत. यामध्ये राजस्थानमध्ये नऊ, गुजरातमध्ये तीन, महाराष्ट्रात 17, कर्नाटकात दोन आणि दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, 'आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.'

सरकारच्या म्हणण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधोरेखित केले आहे की, लसीकरण दर वाढल्याने सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांचे पालन जागतिक स्तरावर कमी होत आहे. तर एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाकडून (NTAGI) मुलांना कोरोनाविरुद्ध लसीकरण करण्यासाठी अद्याप कोणतीही शिफारस मिळालेली नाही.

देशातील 86.2 टक्के वयस्कर लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, 53.5 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशातील 19 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्यादरम्यान आहे, तर तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्क्यांहून अधिक आहे.

1) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 25 प्रकरणे आढळून आली आहेत. ओमायक्रॉन प्रकरणे आढळलेल्या एकूण व्हेरिएंटच्या 0.04 टक्क्यांपेक्षा कमी आहेत.

2) लव अग्रवाल यांनी सांगितल्यानंतर काही वेळात महाराष्ट्र सरकारकडून अन्य काही जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली. यात धारावीमधील एक रुग्ण 49 वर्षांचा असून तो 4 डिसेंबर रोजी टांझानियाहून परतला होता. सरकारने सांगितले की, त्या व्यक्तीने कोणतीही लस घेतलेली नाही, परंतु त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. याशिवाय, पिंपरीत ओमायक्रॉनचे नवे 4 रुग्ण आढळले.

3) लव अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत 59 देशांमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 1 डिसेंबरपासून भारतातील 93 आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी 83 हे ओमायक्रॉन ब्रेकआउट श्रेणीमध्ये ठेवलेल्या देशांतील आहेत, तर इतर जोखीम श्रेणीमध्ये असलेल्या देशांतील आहेत.

4) 24 नोव्हेंबरपर्यंत, फक्त दोन देशांमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली होती. आता 59 देशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या 59 देशांमध्ये 2,936 ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय 78,054 संभाव्य प्रकरणेही आढळून आली आहेत. या सर्वांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

5) सरकारने मास्कचा वापर आणि सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेना मास्कचा वापर कमी झाल्याचा इशाराही देत ​​आहे.