Omicron: भारतात केव्हा येणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक आणि केव्हा होणार अंत? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती... By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:31 PM 2022-01-07T16:31:30+5:30 2022-01-07T16:37:54+5:30
Omicron: देशात कोरोनाचा प्रसार वेगानं होत असून गेल्या २४ तासांत १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे एकूण ३००७ रुग्ण झाले आहेत. पण यात ११९९ जणांनी ओमायक्रॉनवर मात देखील केली आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक नेमका केव्हा गाठला जाणार? आणि लाट केव्हा संपुष्टात येणार याची माहिती जाणून घेऊयात... देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून सध्या देशात दैनंदिन रुग्णवाढ १ लाखाच्या वर पोहोचली आहे. कोरोनाच्या विळख्यात येण्याची ज्यांची शक्यता जास्त आहे अशा लोकांची एकंदर लोकसंख्या पाहता तिसरी लाट देशात लवकरच उच्चांक गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय वैज्ञानिक संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरूच्या टीमनं केलेल्या अभ्यासानुसार भारतात जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक गाठला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गणितीय पद्धतीवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सर्वाधिक दिसून येतील. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाट ओसरण्यास सुरुवात होईल.
मार्चच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित अभ्यास दुसऱ्या लाटेतील संक्रमण, लसीकरण आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती या सर्व गोष्टी विचारात घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या आलेखाचा अभ्यास करुनच तज्ज्ञांनी याचा भारतावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज लावला आहे. अभ्यासानुसार विषाणूच्या सहज विळण्यात सापडणारी लोकसंख्या (म्हणजेच आजारी, सहव्याधी, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे) पाहता देशात दैनंदिन पातळीवर ३ लाख, ६ लाख किंवा अगदी १० लाख रुग्ण देखील आढळून येऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मतानुसार जर देशात ३० टक्के लोकसंख्या कोरोना विषाणू विरोधात कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणारी आहे असं आपण गृहित धरलं तर अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत खूप कमी रुग्ण आढळून येतील.
६ जानेवारी २०२२ पर्यंत देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे ३ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. कारण नव्या व्हेरिअंटच्या DNA आणि RNA मध्ये मिळणाऱ्या जेनेटिक माहितीचा अभ्यास करणं खूप गरजेचं ठरतं. यात महाराष्ट्र आणि दिल्लीतच याची सर्वाधिक प्रकरणं आढळून येत आहेत.
देशात महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक गाठला गेलेला असेल. तर दिल्ली ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या बाबतीत देशात दुसऱ्या स्थानावर आहे. पण दिल्लीत महाराष्ट्रापेक्षाही आधीच रुग्णांचा उच्चांक गाठला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दिल्लीत पॉझिटिव्हीटी रेट महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. त्यामुळे दिल्लीत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वसामान्य परिस्थिती दिल्लीत पाहायला मिळू शकते.