Omicron New Variant: डेल्टाच्या तुलनेत Omicron कमकुवत कसा? AIIMS च्या संचालकांनी सविस्तर सांगितलं... By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 02:10 PM 2022-01-01T14:10:15+5:30 2022-01-01T14:16:08+5:30
Omicron New Variant: नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात कोरोना रुग्णवाढीमुळे सर्वांना चिंता निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनबाबतची महत्त्वाची आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात... नववर्षाचं स्वागत करतानाच सतर्कता बाळगणं देखील महत्त्वाचं झालं आहे. कारण ओमायक्रॉनचा वेगानं प्रसार होत असला तरी तो गंभीर नसल्याचं वारंवार आपल्या कानावर ऐकायला येतं. पण ओमायक्रॉन व्हेरिअंट हे नक्की रसायन काय आहे आणि डेल्टा व्हेरिअंटपेक्षा तो सौम्य कसा? याची सविस्तर माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
ओमायक्रॉनच्या रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता खूप कमीच आहे. त्यामुळे याआधीच्या चूका पुन्हा करण्याची आपल्याला काहीच गरज नाही, असं गुलेरिया म्हणाले.
ओमाक्रॉनचा प्रसार म्हणजे कोरोना काळ संपुष्टात येण्याचा पहिला टप्पा असल्याचं जगभरातील अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. यामागे काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार जेव्हा कोणत्याही देशात ६० ते ७० टक्के लोकांमध्ये इन्फेक्शनमुळे किंवा लसीकरणामुळे अँटिबॉडी निर्माण होतात त्यावेळी म्युटेट व्हायरस स्वत:च स्वत:ला कमकुवत करत जातो. त्यामुळे तो मानवी शरीरासाठी कमी धोकादायक ठरतो. अर्थात सध्याची चिंता ही केवळ संसर्गाच्या वेगाशी निगडीत आहे. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिअंटपेक्षा अधिक वेगानं पसरत आहे.
ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिअंटमध्ये फरक काय? दोन्ही व्हेरिअंटच्या संसर्गाच्या वेगाची तुलना करायची झाल्यास डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा वेग तब्बल ७० टक्क्यांनी अधिक आहे. तर डेल्टाचा प्रसाराचा वेग फ्लूच्या तुलनेत १० पटीनं अधिक आहे. डेल्टाचा फुफ्फुसांवर अधिक प्रभाव पडतो.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा फुफ्फुसांवर १० टक्के कमी प्रभाव पडतो. याचाच अर्थ डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा फुफ्फुसांवर कमी प्रभाव पडतो.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमकुवत का? ओमायक्रॉन जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो श्वासनलिकेत विकसीत होतो. म्हणजेच तो श्वासनलिकेतच थांबतो आणि तिथंच त्याचं इन्फेक्शन होण्यास सुरुवात होते. तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही किंवा तिथंवर पोहोचेपर्यंत त्याची परिणामकारकता कमी होऊन जाते.
याउलट डेल्टा व्हेरिअंट श्वासनलिकेत थांबण्याऐवजी थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि गंभीर स्वरुपाच्या इन्फेक्शनला सुरुवात करतो.
अँटीबॉडीच्या तुलनेत दोन्ही व्हेरिअंटचा प्रभाव वेगवेगळा आहे. ओमायक्रॉन जेव्हा श्वासनलिकेत थांबतो तेव्हा ज्या अँटिबॉडी शरीरातच उपस्थित आहेत त्या या विषाणूला कमकुवत करण्यास सुरुवात करतात. हे सर्व नैसर्गिक पद्धतीनं सुरू होतं. पण डेल्टा व्हेरिअंटमध्ये असं होत नाही. कारण या व्हेरिअंटचा विषाणू श्वासनलिकेत थांबतच नाही. थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो.
ओमायक्रॉनमध्ये सर्वात दिलासादायक बाब अशी की यात मृत्यूदर अतिशय कमी आहे. ज्या व्यक्ती आधीपासूनच खूप आजारी आहेत किंवा सहव्याधी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. पण ओमायक्रॉनच्या तुलनेत डेल्टा व्हेरिअंट अतिशय घातक होता आणि त्यात मृत्यूदर देखील अधिक होता. एप्रिल आणि मे महिन्यात डेल्टा व्हेरिअंटनं घातलेला धुमाकूळ याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. ओमायक्रॉनची लक्षणं घसा खवखवणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणं अशी आहेत. तर डेल्टा व्हेरिअंटमुळे श्वास घेण्यास त्रास होणं यासह आणखी काही गंभीर स्वरुपाची लक्षणं होती.