Omicron Covid-19 : गरज वाटल्यास नाईट कर्फ्यू लावा, मोठ्या सभांवर बंदी घाला; केंद्राचं राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 08:52 AM2021-12-22T08:52:49+5:302021-12-22T09:04:27+5:30

Omicron Covid-19 : देशात सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे. नववर्षाच्या जल्लोषाची तयारी पाहता गर्दी रोखण्यासाठी मुंबई, चेन्नईसारख्या अनेक शहरांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत.

Omicron Covid-19 : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशातील १४ राज्यांमध्ये २२० केसेससमोर आल्या आहेत.

ओमायक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रानं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

ओमायक्रॉन हा विषाणू डेल्टापेक्षा तीन पट अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगत वॉर रुम अॅक्टिव्हेट करण्याचे निर्देश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय कोरोनाशी निगडीत प्रत्येक अपडेटवर नजर ठेवत स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि त्वरित पावलं उचलण्याचेही आदेश देण्यात आलेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी चाचण्या वाढवणं, याशिवाय रात्री कर्फ्यू लावणं, मोठ्या सभांवर बंदी, लग्न आणि अंतिम संस्कारासारख्या ठिकाणी लोकांची संख्या मर्यादित करण्यासारखी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हा स्तरावर कन्टेन्मेंट झोन तयार करणं, कन्टेन्मेंट झोनची मर्यादा ठरवणं, येणाऱ्या केसेसचं निरिक्षण करणं, रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवणे यासाठी पावलं उचलण्याचा सल्लाही केंद्रीय सचिवांनी दिला आहे. यामुळे स्थानिक पातळीवरच अन्य ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोख लावली जाऊ शकते, असंही सांगण्यात आलं.

ओमायक्रॉन हा विषाणू डेल्टा विषाणूच्या तुलनेत तीनपट अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगत वॉर रुम अॅक्टिव्हेट करण्याचा सल्लाही पत्राद्वारे देण्यात आला. याशिवाय प्रत्येक अपडेटवर नजर ठेवत स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि त्वरित पावलं उचलण्याचे निर्देशही देण्यात आहेत.

वॉर रुम, इमरजन्सी ऑपरेशन्स सेंटर्स सुरु करा, याशिवाय केसेसच्या ट्रेंड्सचा अभ्यास करा. रुग्णांची संख्या भलेही कमी असेल,जिल्हा आणि स्थानिक स्तरावर सक्रिय राहावं, फिल्ड अधिकाऱ्यांसह कायम समीक्षा करा, यामुळे संसर्ग कमी करण्यास मदत मिळेल, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोनाचे नवे क्लस्टर कन्टेन्मेंट झोन, बफर झोन तयार करण्यात यावेत, सर्वच क्लस्टरमध्ये सॅपल्स जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत, असंही सांगण्यात आलंय.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन डेल्टापेक्षा तीन पट अधिक संसर्गजन्य आहे, इतकंच नाही, तर अनेक ठिकाणी डेल्टाच्याही केसेस समोर येत असल्याचं यात म्हटलंय.

कन्टेन्मेंट झोनची निवड करणं, टेस्ट, ट्रॅक आणि सर्विलन्सवर फोकस करण्याचा सल्ला केंद्रानं दिला आहे. इतकंच नाही तर डोअर टू डोअर सर्च, टेस्टिंग सारखी आवश्यक पावलं उचलणं. याशिवाय आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवण्याचाही सल्ला देण्यात आलाय.

कोरोनाच्या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचं ट्रेसिंग, याशिवाय जिल्हा प्रशासनानं परदेशातून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवावं, राज्यांनी बेड्सची संख्या वाढवणं, अॅम्ब्युलन्स आणि अन्य मशीनरी, ऑक्सिजन आणि औषधांचा बफर स्टॉक वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

गाईडलाईन्सनुसार होम आयसोलेशनच्या नियमांचा कठोरपणे पालन करण्यात यावं. होम आयसोलेशनच्या वेळी कॉल सेंटर आणि होम विझिटद्वारे त्यांची माहिती घेण्यात यावेळी. तसंच होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून अन्य लोकांमध्ये संसर्ग पसरू नये. याशिवाय केंद्रानं राज्यांना १०० टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे.