एक चूक, १०० पानी रिपोर्ट अन् ३ कमांडो निलंबित; भारताचे 'जेम्स बॉन्ड' अजित डोवाल यांचं सुरक्षाकडं असं भेदलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:31 PM2022-08-18T12:31:33+5:302022-08-18T12:44:41+5:30

तब्बल १०० पानांच्या तपास अहवालात सीआयएसएफनं अजित डोवाल यांच्यासोबत घडलेली घटना ज्या पद्धतीनं घडली त्यावरून हा फिदाईन प्रकारचा हल्ला देखील असू शकतो हे नाकारता येणार नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केलं नाही. बडतर्फ केलेले तीन कमांडो त्यावेळी डोवाल यांच्या घराच्या मुख्य गेटवर तैनात होते. नेमकं काय घडलं? वाचा...

या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. एका व्यक्तीने 'Z+' सुरक्षा असतानाही जनपथ येथील डोवाल यांच्या अधिकृत निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानं कारने निवासस्थानाच्या मुख्य गेटला धडक दिली होती. त्या एका निष्काळजीपणामुळे 3 कमांडोना बडतर्फ करण्यात आले यावरून डोवाल यांच्या भोवतीच्या सुरक्षाकड्याचा अंदाज लावता येतो. २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तेही जेव्हा त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असतानाही झालेल्या चुकीबाबत कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी कठोर कारवाई करत, अजित डोवाल यांच्या सुरक्षेतील त्रुटीच्या ६ महिन्यांनंतर सुरक्षेत तैनात CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) चे 3 कमांडो बडतर्फ करण्यात आले आहेत. याशिवाय डोवाल यांच्या सुरक्षा विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. डोवाल यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे.

सीआयएसएफच्या तपास अहवालाच्या आधारे कमांडो आणि अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेले तीन कमांडो सुरक्षा पुरवण्यासाठी त्या दिवशी एनएसएच्या निवासस्थानी उपस्थित होते. CISF च्या स्पेशल सिक्युरिटी ग्रुप (SSG) युनिटने डोवाल यांना सुरक्षा कवच प्रदान केले आहे. बडतर्फ केलेले तीनही कमांडो एसएसजी युनिटचे आहेत. याशिवाय सुरक्षा युनिटचे प्रमुख असलेले उपमहानिरीक्षक (डीआयजी) कौशिक गांगुली आणि कमांडंट दर्जाचे वरिष्ठ अधिकारी नवदीप सिंग हिरा यांना हटवण्यात आले आहे.

सुरक्षा त्रुटीचे हे प्रकरण 16 फेब्रुवारी 2022 चे आहे. अजित डोवाल हे दिल्लीतील अत्यंत उच्च सुरक्षा क्षेत्र असलेल्या लुटियन्स झोनमधील 5 जनपथ बंगल्यात राहतात. त्यांच्या आधी माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल या बंगल्यात राहत होते. डोभाल यांच्या बंगल्याजवळ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचंही निवासस्थान आहे. त्यादिवशी एका 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' व्यक्तीने त्याची एसयूव्ही डोवाल यांच्या निवासस्थानाच्या गेटमध्ये घुसवली, अशी माहिती नवभारत टाइम्सनं दिली आहे.

शक्तिधर रेड्डी (४३) असे संशयिताचे नाव असून तो बंगळुरूचा रहिवासी आहे. १३ फेब्रुवारीला तो दिल्लीत आला होता आणि नोएडा सेक्टर ६३ मधील हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल सर्व्हिस फर्मकडून लाल रंगाची महिंद्रा XUV 300 कार भाड्याने घेतली. तो १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता अजित डोवाल यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि चुकीच्या बाजूने गाडी चालवत कारनं मुख्य प्रवेशद्वाराला धडक दिली.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार शक्तिधर रेड्डी काही मीटरपर्यंत निवासस्थानाच्या आत जाण्यात यशस्वी झाला. अखेर त्याला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. तो सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगत होता की त्याच्या शरीरात एक चिप बसवण्यात आली आहे, जी MRI करूनही ओळखता येत नाही. रेड्डी त्यावेळी 'अल्प्रॅक्स' नावाचे औषध सेवन करत होते. चीन आणि अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे मन आणि शरीर कोणीतरी नियंत्रित करत असल्याचे तो सुरक्षा कर्मचाऱ्यांना वारंवार सांगत होता. चिपमुळे, त्याच्या शरीरावर आणि मनावर दुसऱ्याचे नियंत्रण असते, असाही दावा त्यानं केला.

सीआयएसएफने गृह मंत्रालयाला या घटनेचा १०० पानांच्या तपास अहवाल सादर केला. यात ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यावरून हा फिदाईन प्रकारचा हल्ला देखील असू शकतो. या प्रकरणात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नाही. अशा परिस्थितीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यासाठी गोळीबार करावा लागला तरी चालणाऱ्या वाहनाला कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवे होते. चुकीच्या बाजूने येऊन गेटला धडकल्याने ड्रायव्हरने प्रथम त्या भागाची रेकी केली असावी, असे अहवालात म्हटले आहे. त्यावेळी तिन्ही कमांडो गेटवर हजर होते मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असंही नमूद करण्यात आलं आहे.

Z+ सुरक्षा ही राष्ट्रपती आणि निवडक VVIPs यांना उपलब्ध असलेले सर्वोच्च श्रेणीचे सुरक्षा कवच आहे. डोवाल यांना समान श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सुरक्षा उपकरणे असलेले एकूण 50 ते 55 कमांडो आहेत. यापैकी 10 एसएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) आणि एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कमांडो आहेत. विशेष बाब म्हणजे केवळ एसपीजी कमांडोच पंतप्रधानांचे संरक्षण करतात, जी देशाच्या सुरक्षेची सर्वोच्च पातळी आहे.

याशिवाय आयटीबीपी, सीआरपीएफ आणि सीआयएसएफचे जवानही सुरक्षेत तैनात आहेत. Z+ सुरक्षेमध्ये तीन लेव्हलचे संरक्षण आहे. पहिल्या स्तराची जबाबदारी एनएसजीकडे आहे. एसपीजी अधिकारी दुसऱ्या सर्कलमध्ये तैनात आहेत. याशिवाय निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तीला 3 शिफ्टमध्ये बुलेटप्रूफ कार आणि एस्कॉर्ट मिळते. आवश्यकतेनुसार अतिरिक्त संरक्षण दिले जाते. गरज भासल्यास अतिरिक्त एनएसजी कमांडोही तैनात केले जातात.