उद्यापासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’; 'असा' होणार बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 03:35 PM2020-05-31T15:35:18+5:302020-05-31T16:04:03+5:30

मुंबई : देशभरात उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे.

या योजनेमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत.

आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होते. परंतु, आता आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे.

सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.

यासाठी ओडिसा, मिझोरम आणि नागालँड ही ३ राज्ये देखील तयार होत आहेत. एकूण २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेच्या शुभारंभासाठी सज्ज असणार आहेत.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.

या योजनेसाठी नवे रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात.

रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात.