ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:29 PM 2024-09-27T19:29:30+5:30 2024-09-27T19:33:32+5:30
Only Free Train In India: भारतीय रेल्वे हे आपल्या देशातील प्रवासाचं लोकप्रिय आणि किफायतशीर साधन आहे. मात्र रेल्वेने प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन, तिकीट आदी आवश्यक असतं. अन्यथा तिकीट तपासणीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी अशीही ट्रेन धावते जिच्यामधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावं लागत नाही. तर या ट्रेनमधून अगदी मोफत प्रवास करता येतो. भारतीय रेल्वे हे आपल्या देशातील प्रवासाचं लोकप्रिय आणि किफायतशीर साधन आहे. मात्र रेल्वेने प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन, तिकीट आदी आवश्यक असतं. अन्यथा तिकीट तपासणीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी अशीही ट्रेन धावते जिच्यामधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावं लागत नाही. तर या ट्रेनमधून अगदी मोफत प्रवास करता येतो.
भारतामध्ये मोफत प्रवास घडवणाऱ्या या एकमेव ट्रेनचं नाव भाक्रा-नांगल ट्रेन आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान, चालणाऱ्या या ट्रेनमधून प्रवास वर्षभर कधीही विनातिकीट अगदी मोफत प्रवास करू शकतात. या ट्रेनमधून दररोज ८०० ते १००० लोक मोफत प्रवास करतात. १९४८ पासून आजपर्यंत मागच्या ७६ वर्षांपासून या ट्रेनच्या माध्यमातून अव्याहत मोफत सेवा दिली जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या ट्रेनचं व्यवस्थापन हे भारतीय रेल्वे पाहत नाही. तर भाक्रा व्यास व्यवस्थापन बोर्ड तिचं संचालन करतो. भाक्रा आणि नांगलदरम्यान प्रवासाचं साधन उपलब्ध करून देण हा ही ट्रेन सुरू करण्यामागचा उद्देश होता. सुरुवातीला या ट्रेनचा वापर कर्मचारी, मजूर आणि धरण बांधण्यासाठीची यंत्रसामुग्री नेण्यासाठी करण्यात येत होता.
या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी जगभरातून लोक येतात. तसेच भाक्रा नांगल धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. ही ट्रेन पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालायची. मात्र नंतर तिचं इंजिन बदलून तिला डिझेल इंजिन जोडण्यात आलं.
भाक्रा-नांगल रेल्वेसाठीचा मार्ग हा शिवालिक पर्वतामधून खोदण्यात आला आहे. या मार्गामध्ये तीन बोगदे आणि सहा स्टेशन आहेत.
या ट्रेनमधून वाटेत येणाऱ्या अनेक गावांमधील लोक प्रवास करतात. एवढंच नाही तर भाक्रा नांगल प्रकल्पाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि पर्यटकही यामधून प्रवास करतात. या ट्रेनच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च हा भाक्रा नांगल योजनेच्या व्यवस्थापनाकडून केला जातो. २०११ मध्ये वाढत्या खर्चामुळे ही ट्रेन बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र एक ऐतिहासिक वारसा आणि परंपरा म्हणून पुढे ही ट्रेन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या ट्रेनचे डबे लाकडाचे आहेत. तसेच ते १९२३ मध्ये कराची येथे बनवण्यात आले होते. आधी तिला १० डबे होते. मात्र आता डब्यांची संख्या कमी करून ३ एवढी मर्यादित करण्यात आली आहे.