India-Pakistan: भारताविरुद्ध पाकिस्तान रचतंय ‘हे’ मोठं षडयंत्र; अमेरिकेच्या रिपोर्टमधून खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 08:35 PM2022-02-05T20:35:57+5:302022-02-05T20:40:22+5:30

India-Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छुपं वॉर पुन्हा एकदा सुरु झालं आहे. भारताविरोधात पूर्वीची रणनीती रचण्याचा डाव पाकिस्तान आखत आहे.

भारतात असलेली शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान पुन्हा षडयंत्र रचत आहे. एका अमेरिकन रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, पाकिस्ताननं भारतात द्वेष पसरवणे, जातीय सलोखा बिघडवणे आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वीच्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तान शांतता बिघडवण्यासाठी भारताविरुद्धच्या जिहादी कारवायांचे समर्थन करत असतो आणि आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या रणनीतीचा अवलंब करत नापाक मनसुबे राबवू लागला आहे. अमेरिकेच्या या रिपोर्टमध्ये भारतासाठी धोक्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकन थिंक टँक हडसन इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने अनेक दशकांपासून जिहादी आणि खलिस्तानी गटांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. या नापाक कारवाया पुन्हा सुरू होणे हा भारताबरोबरच अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेसाठीही चिंतेचा विषय आहे.

विशेष म्हणजे, जर्मनीमध्ये अलीकडेच झालेल्या अटकेवरून भारतात दहशत पसरवण्यास इस्लामाबादचं समर्थन असल्याचं दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जसविंदर सिंग मुलतानी याला लुधियाना न्यायालयात स्फोट घडवून आणल्याच्या आरोपाखाली जर्मनीतून अटक करण्यात आली होती.

रिपोर्टनुसार म्हटलं आहे की, भारतीय अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी युरोपस्थित शीख फुटीरतावाद्यांना जबाबदार धरलं आहे आणि मुलतानी हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. मुलतानीचे पाकिस्तानशी संबंध होते आणि तो सीमा ओलांडून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तस्करीत सामील होता अशी शंका भारतीय अधिकाऱ्यांना आहे.

हडसन संस्थेच्या म्हणण्यानुसार, जसविंदर सिंग मुलतानी हे शीख फॉर जस्टिस मूव्हमेंट (SFJ) चे प्रमुख सदस्य आहेत. SFJ चे सार्वजनिक चेहरे, गुरपतवंत सिंग पन्नून याने मुलतानीशी घनिष्ट संबंध असल्याचा खुलासा करत या गोष्टीची पुष्टी केली आहे.

वर्षानुवर्षे शीख फॉर जस्टिस पाकिस्तानचे पंतप्रधान, रशिया आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांना जाहीर पत्रे लिहून भारताविरुद्ध पाठिंबा मागत आहे. खलिस्तानचा मुद्दा हा भारतासाठी पूर्णपणे अंतर्गत मुद्दा असू शकतो, परंतु अलीकडेच अमेरिकेत खलिस्तानशी संबंधित भारतविरोधी सक्रियता वाढल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिका-भारत संबंधांना धोका आहे.

त्यामुळेच चीनचा महत्त्वाचा मित्र मानला जाणारा पाकिस्तान यात स्वार्थी देश ठरला आहे ज्याचा उद्देश भारत-अमेरिका संबंध कमकुवत करणे हा आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्यामागून संवाद सुरू असल्याची चर्चा सुरु आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचा दावा पाकिस्तानमधील अब्जाधीश उद्योगपती मियाँ मांशा यांनी केला आहे. आम्ही एकत्र येऊन काम केल्यास पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचा दौरा करू शकतात, असंही मांशा म्हणाले

काही दिवसांपूर्वीच पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं. त्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर जोर देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मांशा यांनी केलेला दावा महत्त्वाचा मानला जात आहे. आम्ही पुढील १०० वर्षे भारतासोबत वैर ठेवणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं होतं.