PFI Banned: दहशतवादी संघटनांशी संबंध ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य; या कारणांमुळे PFI वर घातली बंदी... By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:10 PM 2022-09-28T17:10:56+5:30 2022-09-28T17:15:44+5:30
PFI Banned: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. Ban On PFI In India: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. एका अधिसूचनेत सरकारने म्हटले की, पीएफआयचे अनेक प्रमुख यापूर्वी बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा भाग होते. याशिवाय, पीएफआयचे जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशीही संबंध आहेत.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेचे पालन न करणे. केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घालणाऱ्या अधिसूचनेमध्ये म्हटले की, "पीएफआय आणि त्याच्या सहयोगी संघटना देशात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंसक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत. यामुळे देशाची सुरक्षा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्याच्या संवैधानिक अधिकारांचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे."
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पीएफआय विविध गुन्हेगारी आणि दहशतवादी प्रकरणांमध्ये सामील आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा हात कापणे, इतर धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची निर्घृण हत्या, बॉम्बस्फोटांचा कट आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांसारख्या घटनांचा समावेश आहे.
उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत, एखादी मोठी घटना घडते तेव्हा सर्वात आधी पीएफआयचे नाव समोर येते. दिल्लीतील CAA निषेध, शाहीनबाग हिंसाचार, जहांगीरपुरी हिंसाचारापासून ते अलीकडच्या काही महिन्यांतील कानपूर हिंसाचार, राजस्थानमधील करौली हिंसाचार, मध्य प्रदेशातील खरगोनमधील हिंसाचार आणि बंगळुरूमधील हिंसाचार तसेच भाजप नेत्याच्या हत्येसह देशभरातील अनेक हिंसाचार-हत्या प्ररणात पीएफआयचे नाव आले आहे.
PFIमधील अनेकांवर अल कायदा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. PFI स्वतःला दलित आणि मुस्लिमांसाठी लढणारी संघटना असल्याचा दावा करते. 2010 मध्ये सिमी या संघटनेशी संबंध असल्याचा आरोपही झाला होता. मंगळवारी रात्री जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत पीएफआयचे काही संस्थापक सदस्य सिमी या प्रतिबंधित संघटनेचे नेते असल्याचे सांगण्यात आले. पीएफआयच्या जमात-उल-मुजाहिदीनचाही बांगलादेशशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. पीएफआयचे ISIS सारख्या दहशतवादी गटांशीही संबंध असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.
एनआयएने पीएफआयच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. छाप्यादरम्यान तपास यंत्रणांना धक्कादायक बाबी सापडल्या. तामिळनाडूच्या रामनाड जिल्ह्यातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे जिल्हाध्यक्ष बरकतुल्ला याच्या घरातून दोन लॉरेन्स LHR-80 जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय एजन्सींना आयईडी बनवण्याची कागदपत्रे मिळाली आहेत. आयईडी कसा बनवायचा याचे छोटे कोर्सेस यात होते.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतवादी फंडिंग आणि संबंधित प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले. केंद्रीय एजन्सीने डिजिटल गॅझेट्स, कागदपत्रे, दोन खंजीर आणि 8,31,500 रुपये जप्त केले. पीएफआयशी संबंधित चार जणांना येथून अटक करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाच जणांना शुक्रवारी अटक केली, त्यांच्याकडूनही काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.