पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना सुरु होणार; महिन्याला 100 रुपयांचा हप्ता भरावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 02:49 PM2019-06-17T14:49:15+5:302019-06-17T14:52:33+5:30

पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती महिना 100 रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिना 3 हजार रुपये मासिक पेन्शन सुरु होणार आहे.

पेन्शन फंडामध्ये केंद्र सरकार जेवढे शेतकरी भरेल तेवढे पैसे देणार आहे. ही पेन्शन योजना एलआयसीकडून राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सरकार बनविल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी वेगळी पेन्शन योजना सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. सुरुवातीच्या तीन वर्षांत 5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 10 हजार 774 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्या योजनेची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यांच्या कृषीमंत्र्यांना दिली आहे. तसेच ही योजना लागू करण्यास सांगितले आहे.

या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षांच्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

जर शेतकऱ्याचे वय 29 वर्षे असेल तर त्या शेतकऱ्याला 100 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. जर वय कमी असेल तर हप्ता कमी होईल आणि वय जास्त असल्यास हप्ता जास्त भरावा लागणार आहे. केंद्र सरकारही तेवढेच पैसे भरेल असे तोमर यांनी सांगितले.