मोदींनी उल्लेख केलेली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारी 'कुसुम योजना' आहे तरी काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 12:43 PM2022-10-30T12:43:33+5:302022-10-30T12:49:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर रोजी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी शेतीविषयी बोलताना पीएम 'कुसुम योजने'चा उल्लेख केला. ही योजना सुरू करण्यामागे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त १० टक्के खर्च करून सौरपंप बसवता येतात, यातील ९० टक्के खर्च सरकार या योजनेतून करते.

KUSUSM योजनेचे पूर्ण नाव कृषी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान असं आहे. देशात अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी डिझेल इंजिन पंप वापरतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा एक भाग डिझेल खरेदीत जातो. शेतकऱ्यांचा हा खर्च थांबवण्यासाठी ही योजना आणण्यात आली.

कुसुम योजनेच्या माध्यमातून सरकारने खर्चात कपात करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. योजनेनुसार, शेतकरी सौरऊर्जा प्रकल्प बसवू शकतात आणि त्याचा ९० टक्के खर्च सरकार उचलणार आहे. या पंपाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून उत्पन्न मिळवू शकतात. यातून निर्माण होणारी वीजही शेतकरी वीज कंपनीला विकू शकणार आहेत.

शेतीशी निगडित शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, पीक उत्पादक संस्था, पंचायत, एएफपीओ, पंचायती, सहकारी संस्था, पाणी वापर करणाऱ्या घटकांना त्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. हे सर्वजण कुसुम योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेच्या मदतीने डिझेलवर चालणाऱ्या पंपांचे रूपांतर सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपामध्ये करण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च वाचू शकेल. सौर पॅनेलमधून निर्माण होणारी वीज सर्वप्रथम सिंचनासाठी वापरली जाणार आहे.

अतिरिक्त वीज फार्मर्स सरप्लस वितरण कंपनीला (डिस्कॉम) विकली जाईल. यामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांची कमाई सुरू राहील. त्याची देखभाल करणं देखील सोपं आहे. याच्या मदतीने शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

अर्ज करण्यासाठी कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkusum.mnre.gov.in ला भेट द्या. लक्षात ठेवा की अशा अनेक वेबसाइट्स आहेत. त्यामुळे कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइटलाच भेट द्या.

अर्ज करण्यासाठी शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची लिंक वेबसाइटच्या होम पेजवर उपलब्ध आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरा. फॉर्ममध्ये राज्य, सौर पंप क्षमता, नाव आणि मोबाईल क्रमांकासह अनेक माहिती द्यावी लागेल. याशिवाय ओळखपत्राची प्रत सादर करावी लागणार आहे.