Nitin Gadkari on PM Security Breach : "लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं," गडकरींनी ठरवलं पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसला जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:29 AM2022-01-06T08:29:07+5:302022-01-06T08:41:06+5:30

Nitin Gadkari on PM Security Breach : पंजाबमधील घटना दुर्देवी असल्याची गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रतिक्रिया.

Nitin Gadkari on PM Security Breach : पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला आहे. दरम्यान, ही घटना दुर्देवी असल्याचं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

"पंजाबमधील घटना दुर्देवी आहे. लोकशाहीमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदाचा सर्वच सन्मान करतात ही परंपरा राहीली आहे. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु अशा प्रकारचं राजकारण यापूर्वी कधीही देशात झालं नाही," असं गडकरी म्हणाले.

"राज्य सरकारद्वारे सुरक्षा न दिल्याकारणामुळे पंतप्रधान आपला कार्यक्रम करू शकले नाहीत असं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजपर्यंतझालं नाही. ही एक दु:खद आणि दुर्देवी घटना आहे. या घटनेचा जितका निषेध केला जावा तितका कमी आहे," असं ते म्हणाले. आयएएनएसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

रस्ता रोखल्यामुळेच ते (पंतप्रधान) पुढे जाऊ शकले नाहीत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यांना पूलवर थांबावं लागलं. पंतप्रधानांना सुरक्षा पुरवण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती, असंही ते म्हणाले.

त्यांनी लोकांना रोडवर का बसू दिलं, देशाची सर्वोच्च व्यक्ती ज्या ठिकाणाहून जाते, त्या ठिकाणी बॅरिकेट्स का घालण्यात आले नाही? पोलिसांनी त्यांना का थांबवलं नाही याचं उत्तर राज्य सरकारनं दिलं पाहिजे. रस्ता रोखणाऱ्यांना पंजाब काँग्रेसचा पाठिंबा होता हे थेट दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या घटनेसाठी पंजाब सरकार जबाबदार आहे आणि त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु ते यावर राजकारण करत आहेत. हे अत्यंत चुकीचं आणि दुर्देवी आहे. आम्ही जेव्हा राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये असतो तेव्हा पक्ष नाही तर सरकारचे प्रतिनिधी असतो, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास १५ ते २० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खोचक टीका करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधला. एअरपोर्टवर जिवंत पोहोचू शकलो याबाबत मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा, असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

"मी एअरपोर्टवर जिवंत पोहोचू शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा", असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्यांना म्हणाले, अशी माहिती भटिंडा एअरपोर्टच्या व्यवस्थापनानं दिल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर इथं त्यांची रॅली होती. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब सरकारकडे उत्तर मागितलं आहे.