पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार; 'या' मोठ्या घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:00 PM2020-10-20T16:00:41+5:302020-10-20T16:05:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. कोरोना कालावधीत आतापर्यंत मोदींनी सहा वेळा देशाला संबोधित केलं आहे. त्यामुळे आज मोदी नेमकं काय बोलणार, याकडे लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात पहिल्यांदा देशाला संबोधित करताना लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मोदी अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आज आणखी एका पॅकेजची घोषणा करू शकतात. तसे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच दिले.

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत दोन आर्थिक पॅकेज जाहीर केली आहेत. तिसऱ्या आर्थिक पॅकेजचा पर्याय सरकारसमोर खुला असल्याचं सीतारामन म्हणाल्या होत्या.

पंतप्रधान मोदींनी याआधी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर पुढील काही दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पॅकेजची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

गेल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात जवळपास २४ टक्क्यांची घट झाली. त्याचा अभ्यास सुरू करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. कोणकोणत्या क्षेत्रांना मदतीची आवश्यकता आहे, याचा आढावा यामधून घेण्यात आला.

अर्थमंत्र्यांनी दिलेली ही माहिती पाहता आज मोदी अडचणीत असलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करू शकतात.

खाद्य, पर्यटन व्यवसायाला कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या क्षेत्रांसाठी आज मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

कोरोना नियंत्रणात येत असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर येत असली, लोक घराबाहेर पडू लागले असले, तर बाहेर खाणं आणि फिरणं लोक टाळत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि खाद्य क्षेत्रांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बेरोजगाराची समस्या वाढली. त्यामुळे पंतप्रधान रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीनंही काही घोषणा करू शकतात. सूक्ष्म, लघू आणि मध्यम (MSME) क्षेत्रावर मोदींचा अधिक भर असू शकतो.