PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले! By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:49 PM 2024-10-07T18:49:56+5:30 2024-10-07T19:18:00+5:30
PM Narendra Modi 23 Years: आज, सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर असताना २३ वर्षे पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून नरेंद्र मोदी सातत्याने घटनात्मक पदावर आहेत.
आज, सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर असताना २३ वर्षे पूर्ण केली.
२००१ मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनणे हा केवळ गुजरातसाठीच नाही तर भारताच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री कसे झाले? त्यांच्या या प्रवासामागील कहानी फार कमी लोकांना माहीत असेल? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'ने मोदी आर्काइव्ह शेअर केला आहे.
मोदी आर्काइव्हनुसार, २००१ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वीही नरेंद्र मोदींनी तीन दशकं लोकसेवेच्या क्षेत्रात घालवली होती. नरेंद्र मोदींनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एक सामान्य संघ प्रचारक म्हणून केली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर, नरेंद्र मोदी भाजपचे समर्पित कार्यकर्ता म्हणून समोर आले आणि ते आपल्या नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले गेले. फार कमी लोकांना माहीत आहे की, नरेंद्र मोदींनी १९६५ मध्ये कांकरिया वॉर्ड सेक्रेटरी म्हणून जनसंघातून राजकीय प्रवास सुरू केला होता.
गुजरातमध्ये भाजपला मजबूत पक्ष म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नरेंद्र मोदींनी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. त्यावेळी, गुजरातमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपचे अस्तित्व खूपच कमजोर होते. १९८४ मध्ये गुजरातमधील भाजपचे फक्त एक खासदार ए.के. पटेल होते.
१९८५ मध्ये जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदींना भाजपसोबत काम करण्याची सूचना केली होती. त्यानंतर आपल्या राजकीय कौशल्याने आणि दूरदृष्टीने नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भाजपला काँग्रेससमोर एक आव्हान म्हणून उभे केले होते.
यानंतर पक्ष नेतृत्वाने नरेंद्र मोदी यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने विकासाचे नवे आयाम पाहिले आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेने ते पुढे देशाचे पंतप्रधान बनले हे विशेष.
अशा प्रकारे २३ वर्षांपूर्वीची ही घटना एक मैलाचा दगड ठरली. ज्यामुळे भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रभावी नेतृत्व प्रस्थापित केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत.