कलम ३७०, राम मंदिर, जागतिक अर्थव्यवस्था... PM नरेंद्र मोदींनी केले अनेक मुद्द्यांवर भाष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 02:22 PM 2023-12-17T14:22:20+5:30 2023-12-17T14:38:49+5:30
नरेंद्र मोदींनी कलम ३७०, ५ राज्यांचे निकाल, नवीन चेहरे मुख्यमंत्री बनवणे, राम मंदिर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. नवी दिल्ली : संसदेतील 'स्मोक कँडल' प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, त्यांनी कलम ३७०, ५ राज्यांचे निकाल, नवीन चेहरे मुख्यमंत्री बनवणे, राम मंदिर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदींनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस खास असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
१) नुकत्याच झालेल्या संसदेतील स्मोक कँडल प्रकरणावर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेत घडलेल्या घटनेचा उद्देश जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.
२) जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणतीही अशी शक्ती नाही, जी कलम ३७० परत आणेल. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले होते.
३) तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या मूडची झलक दिसली आहे. जनतेने स्थिर, कायमस्वरूपी आणि सेवाभिमुख सरकारचा जनादेश दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
४) 'मोदींची गॅरंटी'वर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकाच्या मनात गॅटंरी म्हटल्यावर चार निकष समोर येतात. धोरण, हेतू, नियम आणि कामाचा ट्रॅक रेकॉर्ड. हे चार निकष आहेत ज्यांच्या आधारे जनता न्यायाधीश ठरते. जनतेचा आमच्या धोरणांना पाठिंबा आहे.
५) पंतप्रधान नरेंद्र म्हणाले की, २०१४ पूर्वी राजकीय अस्थिरतेमुळे देशाचे नुकसान झाले आहे. तसेच, २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच्या विजयाबद्दलही नरेंद्र मोदी बोलले आहेत.
६) नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, जर एखाद्याने स्वत:ला ब्रँड केले असेल तर इतरांचे लक्ष जात नाही. नवीन लोकांच्या कलागुणांची चर्चा होत नाही. नवीन लोक देखील दीर्घ तपश्चर्या आणि अनुभवातून जातात.
७) राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, श्रीरामाच्या दर्शनाने जीवन सफल होते. त्यांना या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले हे त्यांचे भाग्य आहे. हा आनंद मोदींचा नाही. हा भारताच्या १४० कोटी हृदयांचा आनंद आहे. २२ जानेवारीचा हा प्रसंग ‘हर घर अयोध्या, हर घर राम’ येण्यासाठी आहे.
८) जागतिक आर्थिक परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत अर्थव्यवस्थांची स्थिती चांगली नाही. आज भारतातील अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रत्येक क्षेत्र चांगले काम करत आहे. सरकार नव्या बजेटसोबत नवीन योजनाही बनवणार आहे.