ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला. मात्र सरकारच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी 'ऑनलाइन लोकमत'ने नुकताच एक पोल घेतला. त्यामध्ये दोन वर्षातील मोदी सरकारची कामगिरी, बेरोजगारी घटली का? काळा पैसा परत आणण्यासंबधी मोदींनी दिलेले आश्वासन, जगात भारताची पत वाढली आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये हजारो वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली मत नोंदवली असून २२ टक्के सहभागींनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार'ला १०० पैकी १०० गुण दिले असून ७० टक्के सहभागी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधानी आहेत. तर सरकारच्या प्रयत्नांमुळे बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे ५१.१ टक्के सहभागींनी नमूद केले आहे असून सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली झाल्याचे मत ६४.३ टक्के लोकांनी नोंदवले. 'अच्छे दिन' पोलचा निष्कर्ष खालीलप्रमाणे : २२ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीला दिले पैकीच्या पैकी गुण... सरकारच्या प्रयत्नामुळे बेरोजगारी घटली असं ५१.१ टक्के लोकांना वाटतं... मतदारसंघातले सत्ताधारी खासदार समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ४६.१ टक्के सहभागींनी सांगितले असले तरी ४२.३ टक्के लोकांनीना नकार दिला. काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं नसल्याचं मत ४६.२ टक्के सहभागींनी नोंदवले आहे. तर सरकारच्या प्रयत्नांमुळे व्यवसाय करणं पहिल्यापेक्षा तुलनेनं सोपं झाल्याचं ६३.५ टक्के सहभागींच म्हणणं आहे. तर ६९.१ टक्के लोकांनी रस्ते, सिंचन, दूरसंचार आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे. सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली असल्याचे मत ६४.३ टक्के सहभागींनी नोंदवले असले तरीही २४.९ टक्के सहभागींना तसं वाटत नाही. जगातल्या अन्य देशांमध्ये भारताची पत वाढल्याचे ८३.४ टक्के सहभागींनी मान्य केले आहे. मोदी सरकार समाजातल्या सगळ्या घटकांना एकसमान वागणूक देत असल्याबद्दल लोकांच्या मनात दुमत नसून ६७.४ टक्के सहभागींनी त्यास होकार दर्शवला आहे. एकूणच जनता सरकारच्या कामगिरीवर खुश असून निम्म्याहून अधिक म्हणजेच ७०.२ टक्के सहभागींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.