बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:31 PM 2024-09-06T13:31:00+5:30 2024-09-06T13:39:41+5:30
नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडतील अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येते. राजकीय पक्षातील नेते कुठल्याही शक्यतेला नकार देत नाहीत. बिहारमध्ये एनडीए आणि इंडियाशिवाय आणखी एका राजकीय पर्यायाचा उदय होतोय. प्रशांत किशोर यांची जनसुराज संघटनेचं राजकीय पक्षात २ ऑक्टोबरला लॉन्चिंग होतंय.
बिहारमध्ये तीन राजकीय पर्याय उभे राहिलेत. प्रशांत किशोर हे ज्याप्रकारे पुढे येतायेत त्यातून इतर पक्ष अस्वस्थ आहेत. भाजपामध्ये फारशी अस्वस्थता दिसून येत नाही, परंतु आरजेडी आणि जेडीयू यामुळे खूपच त्रस्त आहेत. आरजेडीने यापूर्वीच प्रशांत किशोर हे भाजपची बी टीम म्हणून टीका केली आहे. जेडीयू आणि प्रशांत किशोर यांच्यात फारसं सख्य नाही.
जेडीयूने अद्याप प्रशांत किशोर यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला नाही पण त्यांच्यातही अस्वस्थता जाणवू लागली आहे. जेव्हापासून प्रशांत किशोर यांनी जनसुराज यात्रा सुरू केली तेव्हापासून दोन नेत्यांवर त्यांचे सर्वाधिक लक्ष्य आहे.
सर्वात जास्त प्रशांत किशोर तेजस्वी यादव यांच्यावर हल्ला करतात. तेजस्वीसोबत नितीश कुमार यांचाही समावेश आहे. लालू आणि नितीश यांनी ३० वर्षात बिहार बर्बाद केल्याचे ते वारंवार सांगतात. बिहारमधून बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि स्थलांतर थांबवण्यासाठी या नेत्यांकडे कोणतीही ब्लू प्रिंट नाही असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय जातीय समीकरणे बनवून राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात प्रशांत किशोर यांनी हल्लाबोल करत तेजस्वी यादव यांनाच प्रामुख्याने टार्गेट केले आहे. तर भाजपाचा उल्लेख कधीतरीच प्रशांत किशोर यांच्या तोंडी येतो. बिहारमध्ये सत्तेची कमान भाजपाला कधीच मिळाली नसल्याने प्रशांत किशोर यांच्याकडून त्यांच्यावर फारसे आरोप केले जात नसावेत अशी शक्यता आहे. मात्र त्यांच्या पाठिंब्याने नितीश आणि एकदा लालूही बिहारचे मुख्यमंत्री झालेत.
नितीश यांना टार्गेट केल्यामुळे आणि भाजपाविरोधात आक्रमक होत नसल्याने जेडीयूमध्ये संभ्रमाचं वातवरण आहे ज्याची चर्चा आरजेडीमध्येही सुरू आहे. त्यामुळे नितीश यांच्या मनातही भाजपबद्दल अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.
नितीश यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्यावर चिराग पासवान यांचा राजकीय खेळ पाहिला आहे. यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. अलीकडेच नितीशकुमार यांनी तेजस्वी यांची भेट घेतली आणि आता भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा बिहारमध्ये येत आहेत त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये विविध चर्चा सुरू आहे.
चिराग पासवान यांनी २०२० मध्ये जसं केले होते, प्रशांत किशोरही त्याच मार्गावर आहेत. चिरागने तेव्हा विधानसभेत त्यांचे १३४ उमेदवार जेडीयूविरोधात उतरवले होते. त्यामुळे जेडीयूला ३८ जागांवर फटका बसला. आता प्रशांत किशोर यांचाही हेतू तोच असल्याची शंका आहे. मात्र प्रशांत किशोर केवळ नितीश यांच्याविरोधातच नाही तर तेजस्वी यादवही टार्गेटवर असतील.
नितीश कुमार यांच्या मनात पुन्हा चलबिचल सुरू असल्याचं बिहारमध्ये बोललं जातं. त्यात केंद्र सरकारच्या काही निर्णयावर जेडीयू सहमत नाही. भलेही ते बोलत नसतील मात्र त्यांना निर्णय आवडत नाही. लोकसभा निवडणूक प्रचारात नितीश कुमार यांनी मुस्लिमांना आश्वासित केले होते, घाबरू नका. याआधीही ते भाजपासोबत होते मात्र त्यांनी मुसलमानांना दुखावले नाही. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकावर नितीश सहमत कसे होऊ शकतात असा प्रश्न आहे.
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्याबाबत बोललं जातं ते एनडीएतील नितीश कुमार यांच्यावर बोलतात परंतु भाजपाविरोधात टीका करत नाहीत. त्यामुळे नितीश कुमार यांच्यात मनात चलबिचल सुरू झाली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण २०१५ पासून नितीश कुमारांची भूमिका सातत्याने बदलत राहिली आहे.