Prediction for Arvind Kejriwal: मोठी भविष्यवाणी! भाजपा, मोदींसाठी अशुभ संकेत; केजरीवाल गुजरातमध्ये चमत्कार घडवणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:25 PM 2022-08-23T16:25:12+5:30 2022-08-23T16:34:27+5:30
Arvind Kejriwal Prediction: दिल्लीनंतर पंजाब सर केलेला आप गुजरातमध्ये मोठ्या ताकदीने बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. केजरीवाल आणि आपच्या कुंडलीने मोठे संकेत दिले आहेत. देशाचे भविष्यातील राजकीय वारे कसे असतील याचा गुजरात निवडणूक मोठे उदाहरण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अख्खे राज्य बालेकिल्ला राहिले आहे. असे असताना दिल्लीनंतर पंजाब सर केलेला आप गुजरातमध्ये मोठ्या ताकदीने बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. केजरीवाल यांनी जातीने गुजरातमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्या घडमोडींवर केजरीवाल आणि आपच्या कुंडलीने मोठे संकेत दिले आहेत.
सारे ग्रह केजरीवाल यांच्या बाजुने झाले आहेत, असे वातावरण असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे भाजपासाठी ही चिंतेची बाब झाली आहे. गुजरातमध्ये यावेळी केजरीवाल काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करू शकतात आणि देशाच्या राजकारणात त्यांचे वजन आणखी वाढू शकते, असे असे ज्योतिषीय गणित दर्शवत आहे. ज्योतिषी अश्विन रावल यांच्या अंदाजानुसार एनबीटीने केजरीवालांची राजकीय कुंडली मांडली आहे. काय म्हणतायत ते...
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 2017 च्या गुजरात निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. मात्र, आता त्यांनी गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाला कार्यकर्ते मिळत आहेत, गेल्या वर्षभरापासून केजरीवाल गुजरातमध्ये लक्ष देत आहेत. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असली तरी केजरीवाल यांची कुंडली काही वेगळेच संकेत देत आहे.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी सकाळी 7.30 वाजता हिसार (हरियाणा) येथे झाला. त्यांच्या कुंडलीत नरेंद्र मोदी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या कुंडलीप्रमाणे एक चांगला योगायोग दिसतो. वास्तविक त्यांची कुंडली सिंह राशीची आहे. बुध आणि शुक्र ग्रह लग्नघरात विराजमान आहेत. कुंडलीच्या दुसऱ्या घरात केतू आणि आठव्या घरात राहू आहे. भाग्य स्थानात चंद्र आणि शनि मेष राशीत आहेत. कर्क राशीचा सूर्य आणि मंगळ कुंडलीच्या बाराव्या घरात बसले आहेत. त्याच्या कुंडलीत सूर्याचे स्थान 29 अंश आहे. इथेच खरी मेख आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा शून्य अंश आणि २९ अंश त्या व्यक्तीला जमिनीवरून थेट गगनात नेऊन ठेवतो. मोदींच्या बाबतीतही तेच घडले आहे. मोदींच्या कुंडलीत सूर्य शून्य अंशावर आहे. तर नेहरुंच्या कुंडलीत केजरीवालांसारखाच सूर्य २९ अंशावर आहे. केजरीवालांच्या पक्षाची कुंडली देखील मोठे संकेत देत आहे.
केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची कुंडली २६ नोव्हेंबर २०१२ आहे. कुंडलीत मकर लग्नघरात असून शनि तूळ राशीत उच्चस्थानी कर्माच्या दहाव्या घरात विराजमान आहे. शनीच्या अगदी समोर चंद्र मेष राशीत आहे. आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ग्रहांची स्थिती पाहिली तर, राहु मेष राशीच्या चंद्रावरून जात आहे आणि केतू शनिवर भ्रमण करत आहे. गुरू चंद्रापासून बाराव्या स्थानात जाणार आहे. ग्रहांची ही स्थिती ठीकठाक आहे, उत्तम म्हणता येणार नाही, असे विशारदांचे म्हणणे आहे.
केजरीवालांना पुढील वर्षभरात अत्यंत कठीण आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, अशी ग्रहांची परिस्थिती ऐन गुजरात निवडणुकीवेळीच बनत आहे. या अडचणींनंतरही गुजरातमध्ये आप आणि केजरीवाल मोठा खेळ करून दाखविण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत 182 पैकी किमान ६० जागा आप जिंकण्याची शक्यता आहे.
भाजपामध्ये खांदेपालट नक्की... गुजरात विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली, तर भाजपच्या नेतृत्वातही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कुंडलीत काही ठीक दिसत नाहीय. निवडणुकीवेळी पटेल यांच्या कुंडलीत शनि सूर्यापासून आठव्या घरात 27 अंशावर असेल. याचाच अर्थ शनि आणि सूर्य यांचा षडाष्टक संबंध असेल. हे शुभ मानले जात नाही. अशा स्थितीत संघर्षानंतर भाजप सत्तेच्या जवळ येऊ शकतो, पण नेतृत्वात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.