शत्रू विचारही करू शकणार नाही अशी शस्त्र भारतीय जवानांच्या हातात असतील; PM मोदींचं व्हिजन! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:15 PM 2022-07-18T20:15:54+5:30 2022-07-18T20:29:29+5:30
देशात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. जी शस्त्र इतरही देशांकडे आहेत अशीच शस्त्र आपल्या जवानांच्या हाती देण्याची जोखीम आपण कितीवेळ पत्करणार आहोत. जगात इतर दहा देशांकडे ज्याप्रकारची शस्त्रास्त्र आहेत त्याच शस्त्रांनी माझ्या देशाचा जवान युद्धभूमीत उतरवणं हे शहाणपणाचे लक्षण नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं.
"आपले जवान उत्तम ट्रेनिंग घेतलेले असतील आणि ते परदेशी शस्त्र वापरण्यात यशस्वीही ठरतील. पण अशी जोखीम मी कितीकाळ पत्करत राहणार आहे? जे शस्त्र इतर देशांच्या जवानांच्या हातात आहे. तेच शस्त्र माझ्या देशाचा जवान घेऊन त्यांच्यासमोर का जाईल? शत्रुनं कधी विचारही केला नसेल असं शस्त्र आपल्या जवानांच्या हाती असायला हवं. शत्रुला काही सुगावा लागेल त्याआधीच त्यांचा खात्मा झालेला असेल", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जवानांच्या तयारीकडे लक्ष केंद्रीत करण्यानेच नव्हे, तर त्यांना कोणती शस्त्र आपण उपलब्ध करुन देत आहोत यावरही बरंच काही अवलंबून आहे, असंही ते पुढे म्हणाले.
इतिहासातून शिका- पंतप्रधान मोदी इतिहासात ज्या गोष्टी घडल्या त्यातून आपण धडा घेऊन पुढे जात राहिलं पाहिजे. यातून भविष्यातील रस्ता सुकर होण्यासाठी मदत मिळते. समुद्रातील समृद्ध व्यापारी मार्ग आपला वारसा आहे. आपले पूर्वज समुद्रावर वर्चस्व गाजवू शकले कारण त्यांना वाऱ्याची दिशा आणि अंतराळ विज्ञानाची चांगली माहिती होती, असंही मोदी म्हणाले.
भारताचे संरक्षण क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वीही खूप मजबूत होते. स्वातंत्र्याच्या वेळी देशात 18 आयुध कारखाने होते. जिथं तोफखान्यांसह अनेक प्रकारची लष्करी उपकरणं बनवली जायची. दुसऱ्या महायुद्धात भारत एक संरक्षण उपकरणांचा एक महत्त्वाचा पुरवठादार होता, याचीही आठवण मोदींनी यावेळी करुन दिली.
आपण शस्त्रांच्याबाबतीत सर्वात मोठे आयातदार का बनलो? "आपल्यासोबत असं काय घडलं की आपण शस्त्रांच्या बाबतीत सर्वात मोठे आयातदार देश बनलो आहोत. याचा विचार करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दीड दशकात आपण नवीन कारखाना उभारला नाही. जुनी क्षमताही आपण गमावली. 1962 नंतर सक्तीने धोरणांमध्ये काही बदल झाले. पण संशोधनावर, नवनिर्मितीवर भर दिला गेला नाही. जग खासगी क्षेत्रावर अवलंबून होतं पण संरक्षण क्षेत्र सरकारी विचारांच्या कक्षेत ठेवलं गेलं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
परावलंबी राहण्याची सवय झालीय: पंतप्रधान मोदी "देशातील तरुणांसाठी परदेशात संधी आहेत पण देशात संधी मर्यादित आहेत. रायफलसारख्या साध्या शस्त्रांसाठीही लष्कराला परदेशावर अवलंबून राहावे लागले. मग याची आपल्याला सवयच झाली. त्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी एक प्रकारे मानसशास्त्रीय परिसंवाद करावा लागेल", असं मोदी म्हणाले.
बाहेरच्या गोष्टींच्या मोहातून बाहेर कसे पडता येईल यावर एक सेमिनार घ्या. आधीच्या सरकारांच्या काळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, तेव्हा प्रत्येक संरक्षण करार वादात अडकला होता आणि सैन्याला उपकरणांसाठी अनेक दशके वाट पाहावी लागली. परदेशावरील अवलंबित्व हा आपल्या स्वाभिमानासाठी तसेच सामरिकदृष्ट्याही मोठा धोका आहे.
पंतप्रधान म्हणाले की, आम्ही अनेक प्रकल्पांना चालना दिली. लवकरच पहिली स्वदेशी विमानवाहू नौका नौदलात दाखल होणार आहे. आम्ही केवळ संरक्षण बजेटच वाढवले नाही, तर त्यातील मोठा हिस्सा भारतीय कंपन्यांकडून खरेदीवर खर्च केला.
सुरुवात स्वतःपासून करावी लागेल: पंतप्रधान मोदी "जर तुम्ही तुमच्या मुलाला घरात आदर, प्रेम देत नाही आणि शेजाऱ्यानं तो द्यायला हवा असं तुम्हाला वाटत असेल तर काय उपयोग? तसंच आम्ही आमच्या शस्त्रास्त्रांचा, उत्पादनाचा आदर करणार नाही आणि जगाने आदर करावा अशी इच्छा बाळगणार असून तर काहीच शक्य नाही. आपल्याला सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. जेव्हा भारताने ब्रह्मोस स्वीकारलं तेव्हा जगानं ते स्वीकारलं. आपल्याला आपल्या गोष्टीचा अभिमान असायला हवा", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.