...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले? By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:26 PM 2020-07-03T23:26:31+5:30 2020-07-03T23:51:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांची हिंमत वाढवण्यासाठी, कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता, अगदी अचानकपणे, शुक्रवारी सकाळी लेहपासून साधारणपणे 25 किलो मीटर अंतरावर असलेल्या न्योमा येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी 7:00 वाजता लेह विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने आले. यानंतर ते हेलीकॉप्टरमध्ये बसून सरळ न्योमा येथे पोहोचले.
येथे नॉर्दर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, लाइन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) चीनसोबत असलेल्या वादासंदर्भातील, वास्तविक स्थितीची सविस्तर माहिती दिली.
...पण येथे सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न निर्माण होतो, की पंतप्रधान मोदींनी सीमा दौऱ्यासाठी न्योमाच का निवडले?
त्याचे कारण असे, की न्योमा येथे भारतीय सैन्याच्या ब्रिगेड हेडक्वॉर्टरबोरोबरच अनेक सैन्य रेजिमेंटचे बटालियन हेडक्वॉर्टर्सदेखील आहेत.
महत्वाचे म्हणजे, न्योमा हे ठिकाण भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या सिंधू नदीच्या काठावर वसलेले आहे.
यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील स्थितीची सविस्तर माहिती सैन्य कमांडरांकडून सिंधू नदीच्या तिरावर देण्यात आली.
दरवर्षी जून अथवा जुलै महिन्यात सिंधू दर्शन यात्रेचे आयोजन केले जाते. नव्वदच्या दशकात याची सुरूवात भाजपा नेते तथा माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी केली होती.
यावर्षी कोरोना व्हायरस महामारीमुळे सिंधू दर्शन यात्रेचे आयोजन होऊ शकले नाही.
न्योमा येथे पंतप्रधान मोदींनी भारतीय जवानांनाही संबोधित केले. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनवर निशाणाही साधला. यावेळी मोदी म्हणाले, विस्तारवादाचे दिवस गेले आहेत, आता विकासवादाची वेळ आली आहे आणि विकासवादच भविष्याचा आधार आहे.