Punjab Assembly Election 2022: एक स्टँडअप कॉमेडियन ते पंजाबचे मुख्यमंत्री, असा आहे भगवंत मान यांचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:39 PM 2022-03-10T14:39:16+5:30 2022-03-10T15:09:43+5:30
Punjab Assembly Election 2022: आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप बहुमताच्या दिशेने आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत येत आहे. चंदीगड: आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपला बहुमताच्या दिशेने आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत येत आहे.
117 जागा असलेल्या पंजाबमध्ये यंदा आप 90च्या आसपास जागा मिळवताना दिसत आहे. दरम्यान, यातच आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.
एक स्टँडअप कॉमेडियन, विनोदी अभिनेते ते खासदार आणि आता पंजाबचे मुख्यमंत्री, असा मान यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्सकी हेदेखील राजकारणात येण्यापूर्वी एक कॉमेडियन होते. एक कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष, असा त्यांचा प्रवास आहे.
तशाच प्रकारची पुनरावृत्ती आता पंजाबमध्ये होताना दिसत आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतोज हे भगवंत मान यांचं जन्म गाव. त्यांनी संगरुरच्या एसयूएस महाविद्यालयातील बीकॉम केलं. मात्र, त्यांना नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करायचा नव्हता.
काही तरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कॉमेडी शो सुरू केले. लाफ्टर चॅलेंज या टीव्ही शोमधून त्यांनी टीव्हीत पदार्पण केले.
अनेक वर्षे टीव्हीवर काम केल्यानंतर ते राजकारणात उतरले आणि पंजाब पिपल्स पार्टीतून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 2012मध्ये त्यांनी लहरा येथून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि 2014मध्ये आपने त्यांना संगरुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले. यावेळी मात्र 2 लाख मतांनी विजयी झाले.
2017मध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात जलालाबादमधून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात पराभव झाला.
त्यानंतर 2019मध्ये त्यांनी पुन्हा एकदा संगरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला होता. जिल्ह्यासह त्यांची राज्यातही खूप लोकप्रियता आहे आणि याचाच फायदा आपला झाला.
अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल आणि भगवंत मान यांची लोकप्रियता, या दोन गोष्टीच्या जोरावर आपने पंजाबमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा दारुण पराभव केला. आता भगवंत मान पंबाजचे मुख्यमंत्री होणार, यामध्ये कुठलेही दूमत नाही.