आता वंदे भारत गोव्यातही जाणार, प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार; खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिली माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:04 PM 2023-03-04T23:04:53+5:30 2023-03-04T23:16:49+5:30
Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई-गोवा मार्गावर लवकरच वंदे भारत सेमी-हाय स्पीड एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ३ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. या बैठकीत केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले की, मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत सेमी-हायस्पीड एक्स्प्रेस ट्रेन चालवली जाईल.
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. तसेच, मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून पाहणीनंतर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी शिष्टमंडळाला दिली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने ठाणे आणि कोकण विभागातील रेल्वेच्या अनेक मुद्द्यांवर रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. यावेळी, रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाइकांना स्टॉलचे वाटप, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोबाईल स्टॉल लावणे, त्यांच्या आणि गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, रेल्वे पुलामुळे पूर येऊ नये यासाठी उपाययोजना करणे, यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
याचबरोबर, सावंतवाडी-दिवा रेल्वे सेवा दादरपर्यंत वाढवणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत रेल्वे रुळांवर राहणाऱ्यांचे पुनर्वसन आदी मुद्द्यांवर शिष्टमंडळाने दानवे यांच्याशी चर्चा केली.
तसेच, ठाण्यातील मुंब्रा स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी स्थानक करावे, अशी मागणीही आमदारांनी केली. यासंदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव सादर केल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले.
दरम्यान, सध्या दिल्ली आणि मुंबईत सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आहेत. सध्या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मुंबईला जोडतात. यामध्ये गांधीनगर कॅपिटल-मुंबई सेंट्रल, मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.
यातच, आता गोवा-मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मुंबईत दिल्लीपेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्या असतील. तर दिल्लीजवळ नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नवी दिल्ली-अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस आहेत.