CoronaVirus News: एका लग्नानं झोप उडवली; नवऱ्यासह ३७ जणांना कोरोना झाल्यानं एकच खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 11:08 AM 2020-07-09T11:08:37+5:30 2020-07-09T11:13:40+5:30
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये लादण्यात आलेले निर्बंध अनलॉकमध्ये शिथिल करण्यात आल्यानं कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होऊ लागला आहे.
राजस्थानमध्ये संपन्न झालेल्या एका लग्नानं प्रशासनाची झोप उडवली आहे. एकाच लग्नाला उपस्थित राहिलेल्या तब्बल ३७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये नवरदेवाचाही समावेश आहे.
२७ जूनला अजमेरमध्ये एक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या ३७ जणांमध्ये १३ जण पुष्कर, १८ जण बेवर, ५ जण बोरुंडा आणि १ जण अजमेरमधील आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अजमेरमधील लग्नाला २०० हून जास्त पाहुणे उपस्थित होते. प्रशासनानं घालून दिलेले नियम धाब्यावर या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
लग्नाला आलेल्या ३७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतर पाहुण्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
लग्नात गाण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेली महिलादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे.
लग्नाला उपस्थित राहिलेल्या एका कुटुंबातील तब्बल १४ जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
अजमेरमधील कँटोनमेंट गेट परिसरात हा लग्न सोहळा संपन्न झाला. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंदेखील उल्लंघन करण्यात आलं.
लग्न समारंभासाठी ५० पेक्षा जास्त अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही, असे आदेश राजस्थान सरकारनं ३ मे रोजी दिले आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मात्र या नियमाला अजमेरमधील विवाह सोहळ्यात हरताळ फासण्यात आला.