ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ६ - दक्षिणेचे सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा बहुचर्चित 'काबिल' हा चित्रपट येत्या १५ तारखेला प्रदर्शित होत असून आपल्या आवडत्या अभिनेत्याचा नवा अवतार पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात असून नुकताच 'एअर एशिया'च्या विमानावर चित्रपटाचे पोस्टर व रजनीकांत यांचा लूक रंगवण्यात आला होता. प्रमोशनसाठी हे कमी की काय म्हणून इस्टंट मेसेंजिग अॅपमधील लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपवर रजनीकांत यांचा 'इमोजी' अॅड करण्यात आल्याचे वृत्त फिरू लागले. रजनीकांत यांचा गौरव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने त्यांच्या इमोजी टाकल्याची चर्चा सुरू झाली आणि रजनीकांत यांचे सर्व चाहते खुश झाले. पण हे वृत्त खरे नसून व्हॉट्सअॅपवर ' हा' इमोजी आधीपासूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा इमोजी वा आयकॉन 'वॉल्ट जॅबस्को' या व्यक्तिरेखेवर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे. इमोजीपीडियानुसार, हा इमोजी म्हणजे ' मॅन इन बिझिनेस सूट ' इमोजी असून 'Unicode 7.0 ' चा भाग म्हणून त्याला २०१४ साली मान्यता देण्यात आली होती.