...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:06 PM2020-07-27T18:06:27+5:302020-07-27T18:10:46+5:30

उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदिर अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत येऊन भूमिपूजन करणार आहेत.

मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. मंदिराच्या उभारणीसाठी अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सुपरवायझर अनुभाई सोमपुरा यांनी दिली आहे.

सोमपुरा ३० वर्षांपासून राम मंदिर कार्यशाळेचे सुपरवायझर आहेत. सध्या अयोध्येत मोठ्या प्रमाणात दगड ठेवण्यात आले आहेत. याशिवाय राजस्थानातूनही अयोध्येत दगड आणण्यात येणार आहेत.

राजस्थानातून आणण्यात येणाऱ्या दगड्यांना योग्य आकार देण्याचं काम अयोध्येत करण्यात येणार असल्याची माहिती सोमपुरा यांनी दिली. मंदिराची उभारणी करताना दगडांसोबतच तांबं, लाकूड आणि पांढरं सिमेंट वापरण्यात येईल. मात्र लोखंड आणि स्टीलचा वापर केला जाणार नाही, असं सोमपुरा यांनी सांगितलं.

राजस्थानातून आणल्या जाणाऱ्या दगडांना अयोध्येत विशेष यंत्रांचा वापर करून आकार देण्यात येईल. भूमिपूजनानंतर या कामाला सुरुवात केली जाईल.

मंदिर दीर्घकाळ भक्कमपणे उभं राहावं यासाठी बांधकामात प्रामुख्यानं दगडांचाच वापर करण्यात येणार असल्याचं हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी सांगितलं.

मंदिर उभारणीसाठी भाविकांनी दान केलेलं सोनं, चांदी, तांबं पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे.

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल.

५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.