... अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच राणे शिवसेनेतून बाहेर पडले, पवारांनी केलं होतं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 08:55 AM2021-07-09T08:55:53+5:302021-07-09T09:07:37+5:30

'झंझावात' प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी आपलं संपूर्ण भाषण बाळासाहेबांबद्दलच केलं. माझ्यावर आई-वडिलांनी जेवढं प्रेम केलं, त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी केलं, असं म्हणताना ते भावूक झाले होते.

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. राष्ट्रपती भवनात ४३ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी ४ मंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत.

महाराष्ट्राच्या वाटेला एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योगांची जबाबदारी आहे.

कोकणात शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्यासाठी राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून ताकद दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे, राणेंनी शिवसेना का सोडली, यापासून ते त्यांच्या आणि शिवसेनेच्या मतभेदातील गोष्टींना माध्यमांतून उजाळा मिळत आहे.

शिवसेनेची सत्ता असताना नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यानंतर काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पक्षांतर करत महसूल मंत्रिपद मिळवलं आणि आता भाजपमध्ये जाऊन ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मला कॅबिनेटमंत्री आणि मग मुख्यमंत्री केलं. मी काहीही मागितलं नव्हतं. पण त्यांनी मला दिलं, असे सांगत बाळासाहेबांबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं राणेंनी म्हटले.

दरम्यान, नारायण राणेंनी 'झंझावात' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले, या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे, या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्याहस्तेच करण्यात आले.

त्यावेळी बोलताना, नारायण राणेंना 5 वर्षे मुख्यमंत्री पद मिळालया हवे होते. अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच ते शिवसेनेतून बाहेर पडले, असे गौरवोद्गार शरद पवारांनी काढले होते.

तर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांने ‘मेरिट’ मिळवल्याप्रमाणेच राणेंचे आयुष्य आहे, असे गडकरींनी म्हटलं होतं. नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली.

शिवसेना सोडू नका, असे मी राणेंना समजावले होते. त्यावेळी राणेंच्या डोळ्यांतही अश्रू होते, तसेच मी हा निर्णय आनंदाने घेत नसल्याचे त्यांनी मला सांगितले, याचीही आठवण गडकरींनी या कार्यक्रमात करून दिली होती.

'झंझावात' प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी आपलं संपूर्ण भाषण बाळासाहेबांबद्दलच केलं. माझ्यावर आई-वडिलांनी जेवढं प्रेम केलं, त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी केलं, असं म्हणताना ते भावूक झाले होते.

शिवसेनेचं प्रमुख नेतृत्व बदलल्यानं राणेंच्या आयुष्यात मोठा बदल झाला, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रगतीला अनेकदा ब्रेक मिळाला होता. पण, भाजपाने पुन्हा एकदा राणेंना मोठी संधी दिली.