रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 08:21 AM 2020-05-21T08:21:37+5:30 2020-05-21T10:07:30+5:30
राम मंदिराच्या उभारणीसाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. देशातील राजकीय आणि सामाजिक वादाचे केंद्र बनलेल्या रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत हा वाद संपुष्टात आणला होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने समोर आलेले पुरावे विचारात घेऊन ती वादग्रस्त जागा राम जन्मभूमीच असल्याचे मान्य केले होते.
दरम्यान, आता त्या जागी राम मंदिराच्या बांधणीचे काम सुरू झाले असून, त्यासाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहे. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. लॉकडाऊनमुळे राम मंदिराच्या कामास उशीर होत होता. त्यामुळे ११ मेपासून येथे कामास सुरुवात करण्यात आली आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात जागेचे सपाटीकरण करण्यासाठी मजूर आणि विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टंसिगचे पालन करून मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, या कामादरम्यान, रामजन्मभूमी परिसरामध्ये काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. यामध्ये देवी-देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती, पुष्प कलश, अम्लक, दोरजाम्ब ७ ब्लॅक टच स्टोनचे स्तंभ आणि ६ रेड सँड स्टोनचे स्तंभ आणि ५ फूट आकाराचे नक्षीकाम केलेल्या शिवलिंगाचा समावेश आहे, अशी माहिती ट्र्स्टच्यावतीने देण्यात आली.
रामजन्मभूमी परिसरात सपाटीकरणादरम्यान सापडलेली प्राचीन मू्ती
रामजन्मभूमी परिसरात सपाटीकरणादरम्यान सापडलेले अवशेष असे मांडून ठेवण्यात आले आहेत.
देशात वाढलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राम मंदिराच्या बांधणीचा भूमिपूजन सोहळा स्थगित करण्यात आला होता. रामजन्मभूमीवर विराजमान असलेल्या रामलल्लांची मूर्ती परिसरातील नियोजित स्थळी स्थापित करून ३० एप्रिल रोजी भूमिपूजन करून राम मंदिराच्या बांधणीस सुरुवात करण्याची योजना होती. मात्र नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.