Remote Voting Machine: EVM ला लिमिट! आता RVM वरूनही मतदान होणार; दुसऱ्या राज्यातून, देशातून हक्क बजावता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:52 PM 2023-01-11T13:52:21+5:30 2023-01-11T13:57:09+5:30
निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून राजकीय पक्षांना अभिप्राय विचारले आहेत. टाटाची मोठी मदत. ईव्हीएमवर घोटाळ्याचा आरोप होत असताना आता आरव्हीएमदेखील येणार आहे. यामुळे जे लोक कामधंद्यानिमित्त दुसऱ्या राज्यात किंवा देशात राहतात त्यांना तिथून मतदान करता येणार आहे. हे सारे या आरव्हीएममुळे शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून राजकीय पक्षांना अभिप्राय विचारले आहेत.
RVM म्हणजे रिमोट वोटिंग मशीन आहे. २९ डिसेंबरला निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली होती. ही एक अशी मशीन आहे जी आपल्या गृहराज्यात न येता दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देते.
समजा एखादा व्यक्ती पुण्याचा आहे, तो नोकरीनिमित्ताने बंगळुरू किंवा अमेरिकेला असेल तर तो तिथूम मतदान करू शकणार आहे. एवढ्या लांब असल्याने तुम्ही नेहमीच्या पद्धतीने मतदान करू शकत नव्हता, ते आता शक्य होणार आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पोस्टल मतदान हा पर्याय आहेच, परंतू तो देखील मोजकेच लोक वापरतात किंवा मोजक्याच लोकांना याची परवानगी आहे. यामध्ये सरकारी नोकर बहुतांशवेळा हा पर्याय वापरतात.
आरव्हीएम स्टेशनवर निवडणुकीची, मतदार संघाची माहिती असेल. तुम्हाला त्यावरून मतदार संघ निवडावा लागेल. यानंतर उमेदवारांची यादी समोर येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही मतदान करू शकणार आहात. यासाठी लॉगिनची प्रक्रिया असणार आहे.
निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्येच देशातील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना पत्र लिहून या दूरस्थ मतदान व्यवस्थेच्या कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची माहिती दिली होती. आयोगाने याबाबत पक्षांकडून ३१ जानेवारीपर्यंत अभिप्रायही मागवला आहे. त्याची चाचणीही लवकरच होणार आहे.
रिमोट मतदान करण्यासाठी एका ठराविक वेळेमध्ये मतदारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. यानंतर निवडणूक आयोग त्याची माहिती व्हेरिफाय करेल. यानंतर त्या ठिकाणी रिमोट व्होटिंग सेंटर उभारले जाईल. मत घालण्यापूर्वी मतदान ओळखपत्र आव्हीएमवर स्कॅन केले जाईल. यानंतर त्याला मतदान करता येणार आहे.
मतदान केल्यानंतर, राज्य कोड, मतदारसंघ क्रमांक आणि उमेदवार क्रमांकासह रिमोट कंट्रोल युनिटमध्ये मत नोंदवले जाईल. VVPAT उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि अनुक्रमांक यासारख्या तपशीलांसह राज्य आणि मतदारसंघ कोड व्यतिरिक्त स्लिप प्रिंट करेल. मतमोजणी दरम्यान, RVM चे रिमोट कंट्रोल युनिट उमेदवारांच्या क्रमाने प्रत्येक मतदारसंघातील एकूण मते प्रक्षेपित करेल. मतमोजणीसाठी निकाल गृहराज्यातील रिटर्निंग अधिकाऱ्यांसोबत शेअर केला जाईल.
काही वर्षांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा अभ्यास अहवाल समोर आला होता. यामध्ये स्थलांतराचा मतदानावर होणारा परिणाम नमूद करण्यात आला होता. 29 ऑगस्ट 2016 रोजी, निवडणूक आयोगाच्या पॅनेलने प्रथम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत अहवालावर चर्चा केली होती. आता तो अस्तित्वात येऊ लागला आहे.
निवडणूक आयोगाने आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर आणि इतर काही संस्थांतील तज्ज्ञांशी चर्चा केली. यादरम्यान रिमोट व्होटिंगवर संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे मतदारांना बायोमेट्रिक उपकरणे आणि वेब कॅमेऱ्यांच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरून त्यांच्या मतदारसंघापासून दूर असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करण्याची परवानगी मिळाली.