बारा मजल्यांचे तीन टॉवर, वाचनालय, रुग्णालय, कॅन्टिन, RSSचं नवं ऑफिस तयार, एवढा आला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:53 IST2025-02-13T09:46:26+5:302025-02-13T09:53:31+5:30
RSS New Headquarter In Delhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दिल्लीतील नवं मुख्यालय बांधून तयार झालं आहे. संघाचं हे नवं कार्यालय सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या परिसरात असलेल्या प्रत्येकी १२ मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये पसरलेलं असून, येथे वाहनांच्या पार्किंगसह, रुग्णालय, वाचनालय, ऑडिटोरियम अशा अनेक अत्याधुनिक सुविधा आहे. दिल्लीतील संघाचं हे नवं मुख्यालय कसं आहे आणि त्याच्या बांधकामासाठी किती खर्च आला आहे, याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दिल्लीतील नवं मुख्यालय बांधून तयार झालं आहे. संघाचं हे नवं कार्यालय सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या परिसरात असलेल्या प्रत्येकी १२ मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये पसरलेलं असून, येथे वाहनांच्या पार्किंगसह, रुग्णालय, वाचनालय, ऑडिटोरियम अशा अनेक अत्याधुनिक सुविधा आहे. दिल्लीतील संघाचं हे नवं मुख्यालय कसं आहे आणि त्याच्या बांधकामासाठी किती खर्च आला आहे, याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाच्या या कार्यालयातं नाव केशव कुंज असून, ते चार एकर परिसरामध्ये पसरलेले आहे. तसेच त्याच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च आला आहे. हे कार्यालय भाजपाच्या दीनदयाल उपाध्याय मार्गावर असलेल्या मुख्यालयापेक्षाही मोठं आहे. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयातं संपूर्ण बाधकाम हे संघाचे स्वयंसेवक आणित त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी दिलेल्या देणगीतून झालं आहे. त्यासाठी सुमारे ७५ हजार लोकांना किमान पाच रुपयांपासून लाखो रुपयांची देणगी दिली आहे.
संघाच्या नव्या मुख्यालयातील तीन इमारतींचीं नावं साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी आहेत. या मुख्यालयामध्ये एकूण ३०० खोल्या आणि कार्यालयं आहेत. त्याशिवाय कॉन्फ्रन्स हॉल, ऑडिटोरियम आदी सुविधाही आहेत. साधना इमारतीमध्ये संघाची सर्व कार्यालयं आहेत. तर प्रेरणा आणि अर्चना इमारतींमध्ये निवासाची व्यवस्था आहे. प्रेरणा आणि अर्चना इमारतींमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हिरवागार लॉन असून, तिथे संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. येथे सध्या १३५ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असून, ती २७० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
मागच्या आठ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामकाज झंडेवालान येथील उदासीन आश्रमामधून चालत होतं. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यालयात स्थलांतरित होण्यास सुरुवात केली होती. तसेच आता संपूर्ण कार्यालय नव्या मुख्यालयात स्थलांतरित झाले आहे. मात्र नव्या कार्यालयातील काही भागांचं काम अद्याप सुरू आहे.
या इमारतीचं डिझाइन गुजरातमधील आर्किटेक्ट अनुप दवे यांनी केलं आहे. तर तर बांधकाम दिल्लीतील ऑस्पिशियस कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने केलं आहे. याआधी या कंपनीने विश्व हिंदू परिषदेच्या धर्म यात्रा महासंघ इमारतीसह इतर काही धार्मिक स्थळांचंही बांधकाम केलेलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीमध्ये आपलं पहिलं कार्यालय १९३९ मध्ये उघडलं होतं. ते सध्याच्या मुख्यालयाजवळच होतं. १९६२ मध्ये एका मजल्याचं कार्यालय बनलं होतं. पुढे तिथे आणखी एक मजला बांधण्यात आला. तर २०१६ मध्ये केशवकुंज योजना सुरू झाली. तसेच आता हे विस्तिर्ण असं नवं कार्यालय बांधून तयार झालं आहे.
संघाच्या नव्या मुख्यालयात तीन मोठे ऑडिटोरियम बनवण्यात आले आहेत, त्यांची एकूण क्षमता १३०० हून अधिक आहे. यामधील एका ऑडिटोरियमला विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते अशोक सिंघल यांचं नाव देण्यात आलं आहे. या इमारतीच्या खिडक्यांवर राजस्थान आणि गुजरातमधील पारंपरिक वास्तूकलेमधून प्रेरित असं नक्षीकाम केलं आहे. बांधकामात लाकू़डसामान कमी लागावे म्हणून १००० ग्रॅनाइट फ्रेमचा वापर करण्यात आला आहे.
नैसर्गिक प्रकाश आणि हवा कार्यालयामध्ये येत राहील या दृष्टीने संपूर्ण कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. छपरावर असलेल्या सोलर पॅनलमधून येथील एकूण विजेच्या वापरापैकी २० टक्के गरज भागवली जाणार आहे. त्याशिवाय परिसरात एक सीवेज ट्रिटमेंट प्लँटही तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून मुख्यालयातून बाहेर जाणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करून नंतरच ते पालिकेच्या नाल्यांमध्ये सोडलं जाईल.
मुख्यालयात भोजनालय आणि कँटिनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे सामुहिक पद्धतीने भोजन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच साधना इमारतीच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या केशव वाचनालयामध्ये २५ जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये संशोधनासाठी खास पद्धतीने तयार केलेले संशोधन रूमसुद्धा आहेत. या इमारतीत दिल्ली प्रांत कार्यालय आणि सुरुची प्रकाशनची कार्यालयंही असतील.
त्याशिवाय मुख्यालयामध्ये एक छोटंसं रुग्णालय आणि एक डिस्पेंसरीही तयार करण्यात आली आहे. ती संघ स्वयंसेवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही खुली असेल.
१९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत नव्या मुख्याललयामध्ये कार्यकर्ता मिलन कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. हा कार्यक्रम २१ ते २३ मार्चदरम्यान बंगळुरूमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीची पूर्वतयारी असेल.